उरणच्या पाणजे तसेच दास्तान खाडीकिनारी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात हजारो मैलांचे अंतर कापत फ्लेमिंगो तसेच इतर परदेशी पक्ष्यांचे आगमन होते. या पक्ष्यांचे आगमन ही पक्षीमित्रांसाठी पर्वणीच ठरते. मात्र, या दोन्ही खाडीकिनाऱ्यांवर विकासाच्या नावाखाली मातीचा भराव टाकण्यात येणार असल्याने परदेशी पाहुण्यांची ही आश्रयस्थाने नष्ट होण्याची भीती आहे. या पाश्र्वभूमीवर पाणजे व दास्तान खाडी परिसर पक्ष्यांसाठी संरक्षित पट्टा म्हणून घोषित करण्याची मागणी उरण तसेच विविध ठिकाणच्या पक्षीमित्रांनी केली आहे.
सैबेरीया, रशिया तसेच इतर देशांतून विविध जातीचे पक्षी दरवर्षी भारतातील विविध ठिकाणी येतात. यापैकी अनेक पक्षी उरण परिसरातही तळ ठोकतात.
उरण परिसरात असलेल्या पाणजे खाडीकिनाऱ्यावर या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असलेले मासे, किडे यांचा मोठा साठा असल्याने फ्लेमिंगो, चित्रबलक, ब्लॅक हेडेड ईबीज, सीगल, बी ईटर, समुद्री गरूड तसेच ओपन हेड बील या विविध जातींच्या पक्ष्यांचे थवे येथे आढळतात.
मात्र येथे सुरू असलेल्या मातीच्या भरावामुळे खाडीचा भाग कमी होऊ लागल्याने या परदेशी पाहुण्यांची संख्या रोडावत आहे. त्यामुळे या विभागाला पक्ष्यांसाठी सुरक्षित पट्टा म्हणून घोषित करण्याची मागणी पक्षीप्रेमी व अभ्यासक कामिनी ठाकूर यांनी केली आहे.
येथे येणाऱ्या परदेशी पक्ष्यांसाठी हे स्थान अनुकूल असल्याने कोणतीही व्यक्ती या पक्ष्यांची शिकार अथवा तत्सम गोष्टी करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करून २५ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असा फलक या परिसरात लावला असल्याची माहिती उरणचे वनपाल सी. यु. मराडे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need to give protection to flamingos in panvel