कचरा संकलनादरम्यान ठेकेदारांकडून कुचराई; पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

नवी मुंबई : पालिका क्षेत्रातील ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या गृहसंस्थांना दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र शहरात कचरा संकलन करणाऱ्या वाहनांमधून दरुगधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडत असल्याच्या प्रकाराकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरुगधीयुक्त पाण्याचा उग्र दर्प सर्वत्र पसरत असल्याने नागरिकांचे नाक मुठीत आले आहे. ओला कचऱ्याचे संकलन करणाऱ्या वाहनांमधील सांडपाणी (ड्रेन लॉक) रोखून धरणारे नळ तुटल्याने ते रस्ताभर पसरत आहे. याकडे पालिका स्वच्छता निरीक्षक तसेच ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याच्या तक्रारी पालिका आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत.

शहरातील कचऱ्याचे संकलन सुरुवातीला घंटागाडीद्वारे केले जात होते. त्यानंतर स्थानिक ठेकेदारांच्या मदतीने कचरा उचलला जात होता. त्यामुळे उघडय़ा वाहनांतून कचरा वाहतूक करताना अनेकदा तो रस्त्यावर सांडत होता. त्यावर उपाय म्हणून पालिकेने ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा करण्याची पद्धत  राबवली.

परंतु सध्या कचरा संकलन केला जात असलेली वाहने (कॉम्पॅक्टर) आणि कचऱ्याच्या वाहतुकीकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी वेगवेगळ्या गाडय़ा वेगवेगळ्या  वेळात कचरा संकलन करतात. अनेक कचरा संकलन करणाऱ्या मोठय़ा वाहनांतील  सांडपाण्याचे नळ तुटले आहेत.

कचऱ्यातील सांडपाणी रस्त्यावर पडल्यानंतर र्निजतुकीकरणासाठी औषधाची भुकटी टाकणे बंधनकारक असते. परंतु अनेकदा  त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कचरानिर्मिती स्थळावरून अर्थात घरातून कचरा वर्गीकरणाची सक्ती पालिका करीत असेल आणि स्वत: मात्र कचरा संकलनात कुचराई करीत असेल तर पालिका आणि  ठेकेदाराला जाब विचारावा लागेल. वाहनांच्या दुरुस्तीकडे ठेकेदार आणि पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने याबाबत पालिकेकडे लेखी तक्रार दिल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी दिली.

एन्हवायरो लि. हे कचरा वाहतूक ठेकेदार  आहेत. दरम्यान, कचरा संकलनाबाबत घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त तुषार पवार यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

कचरानामा

  •  ७१० टन शहरातून जमा होणारा कचरा
  •  ४००  टन  दिवसाला जमा होणारा ओला कचरा
  • २५०  टन दिवसाला जमा होणारा सुका कचरा
  •  ६९  मोठय़ा वाहनांतून कचरा संकलन

Story img Loader