नवी मुंबई : ‘एक कुटुंब एक तिकीट’ असा नारा देत राजकीय पक्षांच्या घराणेशाहीवर सडकून टीका करणाऱ्या भाजपला स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेच्या उभारणीत मात्र राजकीय घराण्यांच्या वारसांवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र अगदी ठसठशीतपणे पुढे येऊ लागले आहे. नवी मुंबईतील भाजप आमदार गणेश नाईक यांचे पुत्र संदीप यांच्याकडे पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्षपद सोपवून घराणेशाहीची परंपरा पुढे नेणाऱ्या भाजपने पक्षाची युवा कार्यकारणी निवडताना माजी नगरसेवक, जुने पदाधिकारी यांच्या मुलांना पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या नव्या कार्यकारणीवर नाईकांचा एकहाती प्रभाव राहिला असून आ. मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांना यामध्ये स्थान मिळालेले नाही.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची सगळीकडे धूम असताना भाजपचे नवी मुंबई युवा अध्यक्ष अमित अमृत मेढकर यांनी २६ जणांची युवा कार्यकारिणी सोमवारी जाहीर केली.तुर्भे विभागातील हनुमाननगर भागातून सलग दोन वेळा निवडून आलेले मेढकर यांचे वडील अमृत हे याच भागातील राजकारणातील बडे प्रस्थ राहिले आहे. संदीप नाईक यांच्या निकटवर्तीयांमध्ये ओळखले जाणारे अमित यांनी आपल्या कार्यकारिणीत काही माजी नगरसेवकांच्या मुलांना मोक्याची पदे दिली आहेत.
हेही वाचा…२५ जानेवारीला सर्व बाजार समिती राहणार बंद – एपीएमसी प्रशासन
बेलापूर येथील पक्षाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक जयाजी नाथ यांचा मुलगा धनंजय (उपाध्यक्ष), नेरुळ भागातील पक्षाचे नेते रवींद्र इथापे यांचे पुत्र राहुल (उपाध्यक्ष), माजी नगरसेविका लता मढवी यांचा मुलगा रॉबिन (सरचिटणीस), वाशीतील पक्षाचे नेते संपत शेवाळे यांचा मुलगा सूरज शेवाळे (सरचिटणीस), माजी उपमहापौर भरत नखाते यांचा मुलगा अक्षय (चिटणीस), कोपरखैरणे भागातील दिवंगत माजी नगरसेवक देवीदास हांडेपाटील यांचा मुलगा सुनिकेत हांडेपाटील (चिटणीस), कोपरखैरणेतील माजी नगरसेवक केशव म्हात्रे (अंकल) यांचा मुलगा अभिजीत (चिटणीस) अशांची निवड करण्यात आली आहे. या संपूर्ण कार्यकारिणीवर गणेश नाईक यांच्या कुटुंबाचा एकहाती प्रभाव दिसत असून बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे समर्थक पुन्हा एकदा कार्यकारिणीपासून दूर राहिल्याचे चित्र आहे.
भाजप युवा कार्यकारिणीत नवीन नेमणूक केलेले पदाधिकारी यांचे काम, नागरिकांशी समन्वय कसा आहे हे पाहून पदे देण्यात आली आहेत. यात अपवादात्मक माजी नगरसेवक यांच्या मुलांना स्थान दिले आहे. तेही त्यांचे काम पाहूनच. यात नवे-जुने अनुभवी-अनअनुभवी असे मिश्र आहे. जेणेकरून अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नेतृत्व उभे राहील. – अमित मेढकर, भाजप युवा मोर्चा, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष
हेही वाचा…जरांगे पाटील यांच्या दिंडी मोर्चासाठी मराठा संघटनांची नवी मुंबईत जय्यत तयारी
● पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने राजकीय घराणेशाहीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळाले आहेत. काँग्रेस आणि विरोधी पक्षात असलेली घराणेशाहीमुळे देशाचे झालेले नुकसान हा भाजप नेत्यांच्या भाषणाचा प्रमुख मुद्दा असतो.
● असे असले तरी स्थानिक पातळीवर राजकारण करताना याच घराणेशाहीचा जागोजागी आधार घेण्याशिवाय या पक्षापुढेही पर्याय राहिला नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
● नवी मुंबईत भाजपच्या जिल्हाध्यक्षाची निवड करताना पक्षाने गणेश नाईक यांचे पुत्र संदीप यांचा पर्याय निवडला. नाईक कुटुंबांच्या राजकारणातील एकाधिकारशाही विरोधात एकेकाळी भाजप नेते टीका करायचे. मात्र पक्षप्रवेशानंतर पक्षाची सूत्रे नाईकांच्या पुत्राकडे देण्याची वेळ भाजपवर आली.
● युवा कार्यकारिणी निवडतानाही याच घराणेशाहीच्या मार्गाने पक्षाची वाटचाल दिसून आली आहे.