नेरुळ खारकोपर मार्ग; नेरुळ रेल्वेस्थानकात फलाटाची उंची वाढवण्याचे काम अपूर्ण
मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या नेरूळ-खारकोपर लोकलसेवेला पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाल्याचे सोमवारी दिसून आले. गेल्या २० वर्षांपासून रखडल्यानंतरही या लोकलसेवेच्या मार्गावरील काही कामे अद्याप शिल्लक असल्याचेही दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरील लोकल थांबत असलेल्या नेरुळ स्थानकातील फलाटांची उंची न वाढवण्यात ही पोकळी अपघाताला निमंत्रण देण्याची चिन्हे आहेत.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी उद्घाटन करण्यात आलेली नेरुळ-खारकोपर लोकलसेवा सोमवारपासून नियमितपणे सुरू झाली. वेळापत्रकाप्रमाणे सोमवारी सकाळी ७.४५ वाजता नेरुळहून खारकोपरकडे निघालेल्या पहिल्या लोकलमध्ये जेमतेम ५० प्रवासी दिसून आले. या लोकलचे सारथ्य मोटरमन राहुल नाखवा यांनी केले.
नेरुळ उरण रेल्वे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता. ४९५ कोटींचा हा प्रकल्प जवळजवळ १७८२ कोटींपर्यंत वाढला आहे. अद्यापही खारकोपर पुढील उरणपर्यंतचा रेल्वेमार्ग पूर्ण होण्यासाठी जमिनीबाबतची अडचण सुरूच आहे. परंतु पुढील टप्पा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांनी उद्घाटन समारंभात दिले आहे. वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उलवे नोडमधील रेल्वेप्रवाशांनी काल आनंदाची दिवाळी साजरी केली.
सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी आणि उरण या स्थानकांतील पहिला टप्पा पूर्ण झाल्याने आता सिडको व रेल्वेचे पुढील टप्पा पूर्ण करण्याकडे लक्ष लागले आहे. पहिला टप्प्यातील प्रकल्प पूर्ण झाल्याने उलवे नोडमधील प्रवाशांना दळणवळणाचे साधन उपलब्ध झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील सागरसंगम स्थानक प्रस्तावित आहे, तर तरघर रेल्वेस्थानकावर अद्याप रेल्वेथांबा नाही. त्यामुळे नेरुळ, सीवूडस, दारावे,बामणडोंगरी तसेच खारकोपर या स्थानकावर रेल्वेथांबा घेत आज प्रवाशांनी आनंदात प्रवास केला. खारकोपर ते बेलापूर या रेल्वेमार्गावर खारकोपर, बामणडोंगरी, बेलापूर मार्गावरही आज रेल्वे धावली. उलवे परिसरात राहायला आलेल्या नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांनाही कधी रेल्वे सुरू होणार याची उत्सुकता होती.
- सीवूडस् ते खारकोपर या पहिल्या टप्प्याचे अंतर १२ किलोमीटर असून पुढे खारकोपर ते उरण हे अंतर १५ किलोमीटर आहे.
नेरुळ-खारकोपर या पहिल्या टप्प्यातील रेल्वेमार्गाबरोबरच नेरुळ -उरणपर्यंत रेल्वे सुरू करण्यासाठी सिडको व रेल्वे प्रयत्नशील असून जागेबाबतचा प्रश्न मार्गी लावणार आहोत. या रेल्वेमार्गामुळे उलवे व उरण पट्टय़ाचा झपाटय़ाने विकास होणार आहे. – प्रशांत ठाकूर, अध्यक्ष सिडको
नेरुळ खारकोपर मार्गावरून सुटणारी पहिल्या लोकलचा मोटरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हा कायम लक्षात राहणारी व आनंदाची गोष्ट आहे. – राहुल नाखवा, मोटरमन मध्य रेल्वे
आजपासून नेरुळ ते खारकोपर या मार्गावर धावणारी पहिली लोकल सकाळी ७.४५ला वेळेत सुरू झाली. या पहिल्या गाडीने मी प्रवास केला. या मार्गावर रेल्वेने गाडय़ा वाढवायला हव्यात. त्यामुळे प्रवाशांना याचा चांगला उपयोग होईल. उलवे येथे घेतलेल्या घराच्या कामानिमित्त पहिल्या गाडीने नेरुळहून प्रवास केला ही आठवण कायमस्वरूपी राहील. – डिगंबर बोरोले, नेरुळ, प्रवासी