नेरुळ-खारकोपर लोकल सेवा रविवारपासून सुरू होण्याची शक्यता
नवी मुंबई : मध्य रेल्वेवरील नेरुळ ते उरण या उपनगरीय मार्ग प्रकल्पातील नेरुळ ते खारकोपपर्यंतचा पहिला टप्पा दिवाळीपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सुरक्षा आयुक्तांकडून या मार्गाची मंगळवारी दिवसभर पाहणी करण्यात आली. सायंकाळी किल्ले गावठाण येथे याबाबत बैठक झाली असून चाचणी यशस्वी झाल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे ४ नोव्हेंबरपासून ही सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सकाळपासून रेल्वे सुरक्षा आयोगाचे आयुक्त ए.के.जैन, रेल्वेचे वरिष्ठ पदाधिकारी एस.के.तिवारी, सिडकोचे रेल्वे प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अभियंता एस.के.चौटालिया उपस्थित होते.
भविष्यात नवी मुंबई विमानतळही होणार असल्याने हा प्रकल्प महत्त्वाचाही मानला जातो. या मार्गावर गेल्या आठवडय़ात वेगाची चाचणी यशस्वी झाली होती. आज सुरक्षा चाचणी करण्यात आली.
मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासूनच नेरुळ स्थानकातील फलाट क्रमांक ५ व ६ या मार्गिकेची पाहणी करण्यात आली. फलाट क्रमांक ६ वरून छोटय़ा रेल्वे ट्रॉलीमधून सीवूड्सनंतर पुढील तरघर, बामणडोंगरी, खारकोपर या स्थानकांची व रेल्वे मार्गाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर खारकोपरवरून पुन्हा अधिकाऱ्यांचा लवाजमा रेल्वेच्या परीक्षण वाहनातून नेरुळ स्थानकात दुपारी ३ वाजता परतला. सिडको रेल्वे विभागातील मुख्य अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा आयोगाचे आयुक्त यांची बेलापूर येथे बैठक झाली. लवकरच याबाबतच अहवाल देण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
४ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित?
नेरुळ-खारकोपर मार्गावरील कामाची शेवटची चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्ताकडून करण्यात आली. त्यामध्ये रेल्वेमार्ग, सिग्नल यंत्रणा, गाडीचा वेग याची सखोल चाचपणी केली असून या सर्व तपासणीत कामे योग्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ४ नोव्हेंबरचा या मार्गावरील रेल्वेसेवेचा उद्दघाटनाचा मुहूर्त निश्चित होण्याची शक्यता आहे.
हा रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठीची महत्त्वाची पाहणी आज दिवसभर आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली. याबाबत लवकरच रेल्वे सुरक्षा आयोगाकडून हिरवा कंदील मिळेल अशी अपेक्षा आहे.
– एस.के.चौटालिया, सिडको रेल्वे प्रकल्प मुख्य अभियंता