मुख्यमंत्री, रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन; बेलापूर-खारकोपर सेवाही सुरू होणार; अप-डाऊन मार्गावर प्रत्येकी १० फेऱ्या
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पातील नेरुळ-खारकोपर या टप्प्यावरील सेवा अखेर सोमवारपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी रविवारी सकाळी ११ वाजता या सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे. खारकोपर स्थानकात हा उद्घाटन सोहळा होईल. सोमवारपासून नेरुळ-खारकोपर व खारकोपर-बेलापूर मार्गावर प्रत्येकी १० अप आणि १० डाऊन फेऱ्या सुरू करण्यात येतील. रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे या परिसराच्या विकासाला वेग येण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पासाठीचा ५०० कोटींचा खर्च आता सुमारे १५०० कोटींपर्यंत वाढला आहे. अद्यापही खारकोपरपुढील उरणपर्यंतच्या रेल्वेमार्गासाठी जमीन संपादनाची समस्या कायम आहे. पहिल्या टप्प्याला प्राधान्य देत रेल्वे व सिडकोने या मार्गाचे काम पूर्ण केले आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वे सुरक्षा आयोगाचे आयुक्त ए. के. जैन, रेल्वेचे वरिष्ठ पदाधिकारी एस. के. तिवारी, सिडकोच्या रेल्वे प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अभियंता एस. के. चौलाटिया यांच्या उपस्थितीत या मार्गाची चाचणी करण्यात आली. त्यामुळे ४ नोव्हेंबरलाच या मार्गाचे उद्घाटन होणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती; परंतु अखेरीस ११ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित झाला आहे. रेल्वे सेवेमुळे उलवे परिसरातील नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे.
नेरुळ-उरण रेल्वेमार्गावर सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी आणि उरण ही रेल्वेस्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात नेरुळ ते खारकोपपर्यंत सुरू होणार असून यातील सागरसंगम स्थानक अजून प्रस्तावित आहे, तर तरघर रेल्वेस्थानकावर सुरुवातीला थांबा नाही. पहिल्या टप्प्यात नेरुळ-खारकोपर व खारकोपर-बेलापूरदरम्यान सेवा सुरू होणार आहे.
उद्घाटनानंतर पहिली रेल्वेगाडी खारकोपर ते बेलापूर या मार्गावर धावणार आहे. शिवडी-न्हावाशेव सागरी मार्ग, नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प आणि शेजारीच असणारे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे उलवे नोडकडे मोठे गुंतवणूक केंद्र म्हणून पाहिले जात आहे. येथील लोकवस्ती वाढू लागली आहे. सिडकोच्या उन्नत्ती या गृहनिर्माण प्रकल्पातील नागरिकांनाही नेरुळ-खारकोपर रेल्वेमार्ग सुरू होण्याची प्रतीक्षा होती. रेल्वे सेवा सुरू होणार असल्याने येथील रहिवासी आणि बांधकाम व्यावसायिकांत आनंदाचे वातावरण आहे.
नेरुळ-खारकोपर या पहिल्या टप्प्यातील रेल्वेमार्गाबरोबरच नेरुळ-उरण रेल्वे सुरू करण्यासाठी सिडको व रेल्वे प्रयत्नशील आहे. जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या रेल्वेमार्गामुळे उलवे व उरण पट्टय़ाचा झपाटय़ाने विकास होणार आहे, असा विश्वास सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
उलवे परिसरात खूप मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. सिडकोच्या उन्नती गृहप्रकल्पातही अनेक नागरिक राहत असून रेल्वेअभावी त्यांना खासगी वाहनाने नेरुळ, जुईनगर तसेच बेलापूपर्यंत जावे लागत होते. प्रवासातील अडचणींमुळे अनेकांनी या भागातील घरे भाडय़ाने दिली. आता रेल्वे सुरू होत असल्याने येथील प्रवासी नवी मुंबई व मुंबईशी जोडले जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच रेल्वे सुरक्षा आयोगाकडून या मार्गाची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाली होती. रविवारी या मार्गाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
– एस. के. चौटालिया, मुख्य अभियंता, सिडको रेल्वे प्रकल्प
रेल्वेमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रेल्वे सेवेचे उद्घाटन होणार आहे. अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी १० फेऱ्या होणार आहेत. रविवारी उद्घाटन झाल्यानंतर सोमवारपासून वेळापत्रकानुसार सेवा सुरू होईल.
– अनिल जैन, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
वेळापत्रक
नेरुळहून खारकोपरकडे सुटणाऱ्या गाडय़ा
सकाळी ७.४५, ८.४५, १०.१५, ११.४५, दुपारी १.१५, २.४५, सायं. ४.१५, ५,४५, रात्री ७.१५, ८.४५
बेलापूरहून खारकोपरकडे सुटणाऱ्या गाडय़ा
सकाळी ६.२२, ९.३२, ११.०२, दुपारी १२.३२, २.०२, ३.३२, सायं. ५,०२, ६.३२, रात्री ८.०२, ९.३२
खारकोपरहून नेरुळकडे सुटणाऱ्या गाडय़ा
सकाळी ६.५०, ९.१५, १०.४५, दुपारी १२.१५, १.४५, ३.१५, सायं ४.४५, ६.१५, ७.४५, ९.१५
खारकोपरहून बेलापूरकडे सुटणाऱ्या गाडय़ा
सकाळी ८.१५, १०.००, ११.३०, दुपारी १.००, २.३०, ४.००, सायं. ५.३०, ७.००, ८.३०, १०.००