उद्घाटनाबाबत साशंकता; अद्याप सुरक्षा चाचणीच्या अहवालाची प्रतिक्षा
नेरुळ-उरण रेल्वेमार्गातील पहिल्या टप्प्यातील नेरुळ ते खारकोपर या मार्गावरील सुरक्षा चाचणी यशस्वी झाल्यानंतर दिवाळीपूर्वीचा ४ नोव्हेंबरच्या मुहूर्ताची चर्चा होती. मात्र अद्याप रविवारच्या उद्घाटनाबाबत अनिश्चितता आहे. पोलिसांसह, सिडको प्रशासनास याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
हा रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठी महत्त्वाची सुरक्षा चाचणी मंगळवारी रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांसह रेल्वे व सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. ती सुरक्षा चाचणी यशस्वी झाली असून याबाबत अहवाला लवकरच दिला जाईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे दिवाळीपूर्वी ४ नोव्हेंबरच मुहूर्त अंतिम समजला जात होता. सोशल मीडियावरही रविवारी उद्घाटनाबाबतचे मेसेज फिरत होते. मात्र याबाबत अद्याप कोणी दुजोरा दिला नाही.चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले, परंतु रविवारच्या उद्घाटनाबाबत अद्याप निश्चित माहिती नसल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी सांगितले. तर परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनीही आमच्यापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत काही सूचना आल्या नाहीत असे सांगितले. सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनीही अनिश्चितता व्यक्त केली.
उलवेकरांसह बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष
सीवूडस् ते खारकोपर या पहिल्या टप्प्याचे अंतर १२ किमी असून पुढे खारकोपर ते उरण हे अंतर १५ किमी आहे. एकूण २७ किमीचे हे रेल्वे जाळे विकसित करण्यासाठी सिडकोकडून ६७ टक्के व रेल्वेकडून ३३ टक्के गुंतवणूक करण्यात आली आहे. शिवडी न्हावाशेव सागरी मार्ग, नेरुळ उरण प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे उलवे नोड सर्वात मोठे गुंतवणुकीचे आर्थिक केंद्र बनला आहे. त्यामुळे उलवे परिसरात राहायला आलेल्या नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांनाही खारकोपरपर्यंत कधी रेल्वे सुरू होणार याची उत्सुकता आहे.
मंगळवारी रेल्वेमार्गाची चाचणी करण्यात आली असून ती चाचणी यशस्वी झाली आहे. मात्र, आयोगाकडून कोणत्याही प्रकारचा अहवाल प्राप्त झाला नाही. उद्घाटनाबाबत निश्चित माहिती अद्याप प्राप्त नाही.
– एस. के. चौटालिया, सिडको रेल्वे प्रकल्प मुख्य अभियंता