नवी मुंबई : दुचाकी चोरी प्रकरणी नेरुळ पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी १३ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी नवी मुंबई आयुक्तालयातील ११ व मुंबई आयुक्तालयातील एका गुन्ह्याची उकल करण्यात नेरुळ पोलिसांना यश आले आहे. यात नेरुळ -५, कोपरखैरणे – २, खारघर- ३, सानपाडा-१, उरण-१, डोंगरी-१ येथील दुचाकींचा समावेश आहे.
नेरुळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाला टाटानगर येथे दुचाकी चोरी करणारे दोन युवक राहतात अशी माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारावर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आकाश ठाकरे, तुषार बच्छाव व गुन्हे प्रकटीकरण पथक टाटा नगर, झोपडपट्टी, सीबीडी येथे रवाना झाले. सलग पाच दिवस पोलिसांनी पाळत ठेवूनही संशयित हाती आले नाही.
दरम्यान संशयित व्यक्तींची ओळख पोलिसांना पटली होती. २६ तारखेला गुन्हे प्रकटीकरण पथक गस्त घालत असताना वंडर पार्क येथे स्कुटीवर फिरत असताना संशयित आढळून आले. त्यांना अडवून चौकशी केली असता ज्या स्कुटीवर ते फिरत होते ती स्कुटी चोरी केल्याचे समोर आले. त्यांना ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता दुचाकी चोरीचे १३ गुन्ह्यांची उकल झाली. यापैकी ४ लाख ३२ हजार रुपयांच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.