पालिकेची कारवाई; सिडकोकडून थकवले
नवी मुंबई : मालमत्ताकराच्या वसुलीसाठी नवी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईचा फटका नेरुळ रेल्वे स्थानक संकुलालाही बसला आहे. देयक थकवल्याने पालिकेने या संकुलाचे पाणी तोडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाणी नसल्याने येथील व्यापाऱ्यांसह प्रवासी व नागरिकांचे हाल होत आहेत.
विशेष म्हणजे हे देयक सिडकोने थकवले आहे. सिडकोने व्यापाऱ्यांकडून पैसे वसूल केले मात्र पालिकेचे देयक न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाण्याअभावी रेल्वेस्थानक संकुलाची सफाई झाली नसल्याने प्रवाशांना नाक मुठीत धरून चालण्याची वेळ आहे. रविवारपासून या संकुलात पाण्याचा पुरवठा बंद झाल्याने १८४ व्यवसायिक आणि रेल्वेस्थानक संकुल पाण्याअभावी तहानलेले दिसत आहेत. १६ लाख ६३ हजार रुपयांच्या थकबाकीसाठी ही जलजोडणी बंद करण्यात आली आहे. रेल्वेफलाटावर या संकुलातील पाण्याच्या टाकीमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र जलजोडणी बंद केल्याने आता प्रवाशी आणि संकुलातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत.
नेरुळ रेल्वेस्थानक संकुलात व्यावसायिक संकुल आणि रेल्वेला एकत्रित पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी जलजोडणीधारक म्हणून सिडको असून सिडको या परिसरातील रेल्वे आणि जल उपभोक्त्यांकडून प्रत्येकी ४०० रुपये वसूल करते. मात्र सिडकोने नियमित वसुली करून देखील महापालिकेला देयकाचा भरणा केला नाही. याबाबत सिडकोचे अभियंता राजेश जैस्वाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. देयक न दिल्याने पाणीपुरवठा खंडित केल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा उपअभियंता सुरेश लगदिवे यांनी सांगितले.
महापालिका जल विभागाच्या अभियंत्यांनी जलजोडणी पुन्हा सुरू करण्यास नकार दिला असून सिडकोशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. मोठय़ा प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रेते असल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना पाणी मिळत नसल्याने नाराजीला सामोरे जावे लागत आहे.
विजय घाटे, अध्यक्ष, नेरूळ रेल्वे स्थानक संकुल