नवी मुंबई, विशेष प्रतिनिधी
चार दिवस कुटुंबासह किंवा देशीपरदेशी सहलीचा आनंद घेत दिवाळी साजरी करण्याच्या या काळात काही सामाजिक कार्यकर्ते आगळीवेगळी दीपावली साजरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच काही संस्था, व्यक्ती रायगड किल्ल्यावर दीप प्रज्वलित करतात, तर काही जण आदिवासी भागात फराळवाटपाचा कार्यक्रम आखतात. नेरुळ येथील अशाच एका सामाजिक संस्थेच्या काही कार्यकर्त्यांनी अतिवृष्टीमुळे नामशेष झालेल्या पुणे तालुक्यातील माळीण गावामधील ग्रामस्थांच्या सोबत फराळाचा आनंद घेत दिवाळी साजरी केली. विशेष म्हणजे माळीण गावावर नैसर्गिक आपत्ती कोसळल्यानंतर आलेल्या पहिल्या दिवाळीला अनेक संस्था, व्यक्तींनी या गावात दिखाव्यासाठी धाव घेतली होती. त्याचे चित्रण करायला प्रसारमाध्यमही तेवढीच होती, पण या माळीण दुर्घटनेनंतरच्या दुसऱ्या दिवाळीला माात्र बोटावर मोजण्याइतक्याच संस्थांनी हे उत्तरदायित्व पाळले होते.
मुंबईपासून २४० किलोमीटर अंतरावर असलेले माळीण हे दुर्गम भागातील गाव गतवर्षी ३० जुलै रोजी होत्याचे नव्हते झाले. डिंभे धरणामागे असलेल्या या गावावर २९ व ३० जुलै १४ रोजी संततधार पावसामुळे डोंगरच कोसळल्याने गावातील १५१ ग्रामस्थांवर काळाने झडप घातली.
गावातील केवळ १६ कुटुंबे कशीबशी वाचली असून त्यांच्यासाठी सरकारने अध्र्या किलोमीटर अंतरावर एक निवारा शेड बांधली आहे. त्यात हे ग्रामस्थ आता उद्ध्वस्त झालेल्या गावाकडे बघत दिवस काढत आहेत.
धोकादायक दरडीमुळे सरकारने गाव रिकामे केले असून पावसाळ्यात चिखलाचा ढीग आणि अस्ताव्यस्त तुटलेल्या घरांचे अवशेष, विर्दन गाव याशिवाय दुसरे चित्र दिसून येत नाही. गावातील अनेक तरुण, चाकरमानी हे पोटापाण्यासाठी मुंबई- पुण्यात कामाला असल्याने आता केवळ गावाच्या आठवणी शिल्लक राहिल्या आहेत. या गावातील ग्रामस्थांची दुसरी दिवाळी कशी असेल याचा विचार करून त्यांच्या दिवाळीत आनंदाचे दोन क्षण फुलवण्याचा निर्णय युथ कौन्सिल या नेरुळमधील संस्थेने घेतला आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संस्थेच्या काही कार्यकर्त्यांनी थेट माळीण गाव गाठले. या वेळी त्यांच्यासोबत आरसीएफचे काही अधिकारीही होते. या संस्थेने ग्रामस्थांना फराळ तर दिलाच, पण महिलांना साडी व मुलांना क्रिकेटचे साहित्याचे वाटप केले. त्या वेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांना लपवता आला नाही.
दिवसभर या ग्रामस्थांच्या सान्निध्यात दिवाळी साजरी करून संध्याकाळी ही मंडळी घरातील लक्ष्मीपूजनासाठी माघारीदेखील परतल्याने एकाच वेळी दोन्ही आनंद या कार्यकर्त्यांना घेता आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा