नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बेकायदा फेरीवाल्यांची संख्या सातत्याने वाढतच आहे. नेरुळ हे शहरातील महत्त्वाचे उपनगर असून नेरुळ विभागात या फेरीवाल्यांनी नागरिकांची वाट अडवली असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. ही समस्या गंभीर होत असल्याने पोलीस संरक्षणात त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
नेरुळ विभागाच्या तत्कालीन विभाग अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आता विनोद नगराळे यांच्याकडे विभाग अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या कारवाईला वेग आला आहे. चार दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याने रेल्वे स्थानक परिसर दुतर्फा फेरीवाल्यांपासून मुक्त झाला आहे. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी केली आहे.
फेरीवाल्यांच्या जागा नेरुळ विभागात नेरुळ रेल्वे
स्थानक पूर्व व पश्चिम, नेरुळ पूर्वेला अभ्युदय बॅंकेसमोरील पदपथ, उड्डाणपुल, नेरुळ बस डेपो, शिरवणे मार्केट परिसर, जुईनगरमधील चिंचोली तलावाकडून रेल्वे स्थानक रस्ता, नेरुळ सेक्टर १०, नेरुळ सेक्टर १६ आदी ठिकाणी फेरीवाले मोठय़ा प्रमाणात आहेत.
नेरुळ रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे हा परिसर फेरीवालामुक्त झाला आहे. – विनोद नगराळे, विभाग अधिकारी, नेरुळ