संतोष जाधव, नवी मुंबई
महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी असलेल्या नेरुळ ते भाऊचा धक्का ‘रो-रो’ सेवा कधी सुरू होणार याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले असून या वर्षांत जूनअखेपर्यंत ही सेवा सुरू करण्यात येईल, असे मेरिटाइम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अर्ध्या तासात मुंबईत जाता येणार आहे.
मांडवा येथील जेट्टीचे कामही अंतिम टप्प्यात असून जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत मांडवा ते भाऊचा धक्का या मार्गावरही रो-रो बोटसेवा सुरू करण्यात येणार आहे.
सिडकोच्या वतीने वर्षभरापासून नेरुळ येथील टी.एस. चाणक्याच्या मागील बाजूस नेरुळ जेट्टीचे काम सुरू आहे. त्यासाठी १११ कोटी खर्च अपेक्षित आहे. या कामात खाडीकिनारा व कांदळवनांची अडचण निर्माण झाली होती; परंतु ती अडचण आता दूर झाली असून कामाला वेग आला आहे. या ठिकाणी १ हेक्टरपेक्षा अधिक कांदळवने काढून उन्नत मार्ग तयार केला आहे. सुरुवातीला प्रथम ‘ए’ रो-रो बोट चालवण्यात येणार असून याबाबतचा करारही करण्यात आला आहे.
नेरुळ येथील जेट्टीचे काम व त्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. पहिल्यांदा एक रो-रो बोट सुरू करण्यात येणार आहे. ३५० प्रवासी व ५० कार या बोटीतून घेऊन जाता येणार आहेत. याचप्रमाणे वाशी, बेलापूर ते भाऊचा धक्का या परिसरातून हॉवरक्राफ्ट सुरू करण्याबाबत काम सुरू आहे. तसेच काशिदपासूनही हॉवरक्राफ्ट सुरू करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे.
– डॉ. रामास्वामी एन., अध्यक्ष, मेरिटाइम बोर्ड