शीव-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने एनएमएमटीचे बस थांबे काढून नवे बस थांबे बसविले आहेत, मात्र नव्या थांब्याची आता दुरवस्था झाली आहे. ना बसण्यासाठी जागा, ना सावलीसाठी छत, अशी स्थिती आहे.

ठाणे ते बेलापूर मार्गावर तुभ्रे नाका, जुई नगर रेल्वे स्थानक, नेरुळ ब्रिज खालील परिसर, कोकण भवन या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने बस थांबे उभारले आहेत. सुमारे तीन महिन्यांपूर्वी हे थांबे बसवण्यात आले आहेत. जुने बस थांबे एनएमएमटीने दोन वर्षांपूर्वी बसविले होते. ते सुस्थितीत असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या जागी स्टिलचे १६ नवे बस थांबे उभारले. या बस थांब्यामध्ये आसनव्यवस्था नाही. दिवे नसल्यामुळे रात्री अंधारात उभे रहावे लागते. पाऊस आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत बसवण्यात आलेले नाही. या थांब्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये असून अवघ्या तीन महिन्यांतच ते मोडकळीस आले आहेत. एकीकडे एनएमएमटीचे वेळापत्रक कोलमडले असताना दुसरीकडे थांबेही खिळखिळे झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

शीव-पनवेल मार्गावरील एनएमएमटीचे बस थांबे काढून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी पीडब्लूडीने बस थांबे बसवले आहेत. नवी मुंबईतील प्रवाशांची त्यामुळे गैरसोय होत आहे. त्यांना होणारा त्रास पाहता, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवण्यात येईल.

– शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक