उरण : मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाला असून या हंगामाची सुरुवात होत आहे. १५ ऑगस्टपासून उरणच्या करंजा बंदरात सुरू झालेल्या मासळी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. स्वस्त दरात मासळी खरेदी करण्यासाठी मुंबई, कल्याण, अलिबाग, ठाणे येथील व्यावसायिक आणि स्थानिक रहिवासी हे करंजा बंदरात येऊ लागले आहेत.
उरण तालुक्यातील किनारपट्टीवरील करंजा, मोरा, दिघोडे, आवरे परिसरात मोठ्या प्रमाणात खोल समुद्रातील मासेमारी करण्यात येत आहे. यामध्ये सुमारे ७०० पेक्षा अधिक मासेमारी बोटी असून मासळीची खरेदी-विक्री करण्यासाठी त्यांना मुंबईतील ससून डॉक आणि भाऊचा धक्का येथे जावे लागत होते. दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ६०० मीटर लांबीचे ‘फिशिंग- डॉक’ करंजा येथे उभारण्यात आले आहे. यामध्ये मासेमारी बोटीतील मासळी बंदरात उतरवून त्याच्या खरेदी-विक्रीला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नव्याने सुरू झालेल्या ‘करंजा – द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदर’ येथे अनेक व्यापारी आणि स्थानिक रहिवासी हे घाऊक आणि दैनंदिन गरजेसाठी आवश्यक मासळी खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.
आणखी वाचा-शेतकऱ्यांच्या वाढीव मोबदल्याची कोट्यवधींची थकबाकी, शासनाचे वाटपाचे आश्वासन कागदावरच
सायंकाळच्या सुमारास भरणाऱ्या बाजारामध्ये छोट्या करंदीपासून कोलंबी, पापलेट, सुरमई, रावस, कलेट, हलवा, कुपा, बोंबील अशा सुमारे ३० ते ४० प्रकारचे अनेक मासे विक्रीसाठी दिसून येत आहेत. तर करंजा येथील या बंदरात १०० रुपयांपासून १२०० रुपये किलोच्या दराने मासळी विक्री करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मासळी खरेदी करण्यासाठी अनेक व्यावसायिकदेखील गर्दी करू लागले आहेत. करंजा बाजारात बला, वाम, पाला, माखली, मांदेली, ढोमी, पाकट, शिंगाला, चिंबोरी असे मासेदेखील विक्रीसाठी आले आहेत.
बोंबिलाचे दर घसरले
जून-जुलै महिन्यात किलोला २०० ते १५० रुपये दर आता बोंबील माशांची आवक वाढल्याने दर कमी होऊन तो प्रति किलो ५० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य खवय्यांना याचा लाभ मिळत आहे.
मासेमारीचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. मात्र उपवासाचे दिवस आणि मासळीच्या दुष्काळामुळे मासेमारीसाठी खर्च केलेली रक्कमही वसूल होत नसल्याचे चित्र आहे. -विनायक नाखवा, मच्छीमार
आणखी वाचा-उरण-पनवेल रस्त्यावर खड्ड्यांमुळे ‘धूळ’वड
कोळंबी २००-४००
टायगर कोलंबी १२००
पापलेट ८००-१२००
सुरमई १०००
कलेट ७००-१२००
कुपा १००
हलवा ७००-१२००
नारबा २००
बोंबील १५०