मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सभापती आणि उपसभापती यांच्या त्यांच्या स्थानिक बाजारपेठेतील कार्यकाळ संपल्याने त्यांचे एपीएमसीतील पदही रद्द झाले होते.  त्या अनुषंगाने सभापती अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी डिसेंबर महिन्यात पणन संचालकांकडे राजीनामा दिला होता.  तेव्हापासून ही पदे रिक्त आहेत.  त्यामुळे एपीएमसी बाजार समितीतील संचालक मंडळ अपूर्ण आहे.  मागील आठवड्यात सभापती निवडणूक घेण्यात येणार होती, परंतु त्याला पणन मंडळाने स्थगितीचे आदेश दिले आहेत . यामुळे संचालक मंडळ सभापती निवडणूक लांबणीवर गेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवी मुंबई :पगारवाढ केला नाही म्हणून गोपनीय माहिती असलेल्या लॅपटॉपची चोरी

संचालक मंडळ पूर्ण नसल्याने एपीएमसी बाजार समितीतील नवीन प्रस्तावित विकास कामांचा खोळंबा होत आहे, अशी प्रतिक्रिया इतर संचालकांकडून व्यक्त होत आहे. राज्यातील त्या-त्या विभागातील एपीएमसी संचालकांचे तेथील पद रद्द झाल्याने संचालक म्हणून अपात्र ठरले आहेत. मुंबई एपीएमसीसह सहा विभागातून निवडून आलेल्या १८ संचालकांपैकी ७ संचालकांचे पद रद्द झाले होते. त्याबाबत पणन संचालक तथा मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी घेण्यात आली असून अद्याप त्याचा निर्णय गुलदस्त्यात आहे. यादरम्यान सुनावणी आधीच सभापती अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी २१ डिसेंबर रोजी राजीनामा दिला होता. 

हेही वाचा >>> मागील आठवड्याभरापासून नवी मुंबई हवा प्रदूषणाच्या विळख्यात; गुरुवारपासून वाशीचा गुणवत्ता निर्देशांक साडेतीनशे पार

सभापती यांनी राजीनामा दिला असून या घटनेला आता एक महिना पूर्ण होत आल्याने अद्याप सभापती पद रिक्त आहे. तसेच सभापती, उपसभापती नसल्याने संचालक मंडळ ही अपूर्ण आहे.  त्यामुळे संचालक मंडळाची बैठक ,त्यामध्ये पटलावर घेण्यात येणाऱ्या नवीन विकास कामांचा प्रस्ताव, बैठका बंद आहेत . नवीन विकास कामांमध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण,  गटारांची  मलनिसारण वाहिन्यांची  कामे, इत्यादी कामे होणे बाकी आहेत.  याआधी झालेल्या बैठकीतील प्रस्तावित मंजूर कामे सुरू आहेत , परंतु नवीन कामांचा मात्र खोळंबा होत आहे . मान्सूनच्या आधी ही कामे होणे गरजेचे आहे . प्रस्ताव पटलावर घेतल्यानंतर मंजूर मिळाल्यानंतर त्या प्रक्रियेला तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटतो त्यामुळे ही कामे लवकरात लवकर होणे गरजेचे आहे असे मत संचालक निलेश वीरा यांनी व्यक्त केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New proposed development work in apmc market hit due to board of directors in apmc not complete zws