नवी मुंबई : नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी केले जाणारे स्फोट, ध्वनी तसेच वायू प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी आखण्यात आलेल्या उपायांना दाखविल्या जाणाऱ्या वाकुल्या, वेळी-अवेळी सुरू रहाणारी यंत्रांची धडधड, रस्ते अडवून उभी रहाणारी बांधकाम साहित्याने भरलेली वाहने यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा ओघ सातत्याने वाढू लागला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यासंबंधी आखलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचा समावेश थेट बांधकाम परवानगीच्या नियमांमध्ये करण्याचा विचार सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकाळी नऊ वाजेपासून सुर्यास्त होईपर्यत बांधकामे सरू राहतील अशास्वरुपाचा एक नियम मध्यंतरी महापालिकेने तयार केला होता. या नियमालाही कायद्याचे स्वरुप देता येईल का याची चाचपणी प्रशासनाकडून केली जात आहे. बिल्डरांना बांधकाम परवानगी (सीसी) देतानाच यापैकी काही सूचनांचा समावेश नियम, अटीद्वारे केला जाणार आहे.

हे ही वाचा… पनवेल: खड्ड्यामुळे २४ वर्षीय तरुणी ठार

नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये इमारतीचा पाया खणण्यासाठी करण्यात येणाऱ्या नियंत्रित स्फोटांमुळे आसपासच्या इमारतींना बसणारे हादरे आणि बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत असताना महापालिका प्रशासनाने मध्यंतरी या प्रकारांना आळा बसावा यासाठी एका विशेष नियमावलीची आखणी केली आहे. महापालिका आयुक्त डॉ.कैलाश शिंदे यांनी मध्यंतरी यासंबंधी एका विशेष अभ्यासगटाची नियुक्ती केली होती. त्यानुसार ठराविक वेळेत बांधकाम प्रकल्पांची कामे सुरू ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी कोणकोणते उपाय आखावेत यासंबंधी या नियमावलीत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान या नियमावलीची अनेक उपनगरांमध्ये योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी आहेत. विशेषत: वाशी, सीवूड सारख्या उपनगरांमध्ये रात्री उशीरापर्यत बांधकामे सुरु ठेवली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाशी सेक्टर २ येथील मेघदूत, मेघराज सिनेमागृहाच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाच्या ठिकाणी उशीरापर्यत कामे चालत असल्याच्या तक्रारी आहेत. बांधकाम साहित्य घेऊन येणारी वाहने रस्ते अडवत असल्याने रहिवासी मेटाकुटीस आले आहेत.

हे ही वाचा… भाजपच्या बेलापुरात नाईकांचा ‘सांगली पॅटर्न’? वाढदिवसानिमित्त संदीप नाईकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

बांधकामांची परवानगी देत असताना यापुढे नव्या सूचनांमधील अनेक मुद्दयांचा समावेश करण्यासंबंधी अभ्यास सुरू आहे. यासंबंधीचा अंतिम मसुदा शहरविकास विभागामार्फत लवकरच जाहीर केला जाईल. बांधकाम सुरू करण्याच्या तसेच थांबविण्याच्या वेळांचे बंधनही बांधकाम परवानगी प्रमाणपत्र देतानाच टाकण्यात येईल. – डॉ. कैलाश शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New rules and manuals for pollution control while granting construction permission in navi mumbai city soon asj