लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मराठी नववर्ष तसेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वच शहरांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने नवी मुंबईतील विविध भागांत भव्य स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीम पथकांच्या तालावर तसेच पारंपरिक वेशभूषांमध्ये मिरवणुका निघणार आहेत. त्याच्या तयारीसाठी नवी मुंबईत उत्साहाचे वातावरण आहे.

मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्या दिवशी नवी मुंबई येथील विविध शहरात अनेक संस्थांच्या वतीने भव्य स्वरूपात स्वागत यात्रा काढली जाते. यंदादेखील दरवर्षीप्रमाणे स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रांमध्ये शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती तसेच विविध सामाजिक संस्था आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

वाशी येथील स्वागत यात्रा सकाळी ७.३० वाजता श्री स्वामिनारायण गुरुकुल, सेक्टर-२९ येथून गावदेवी मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप होईल. या भव्य सोहळ्यात अनेक सहयोगी संस्था पारंपरिक वेशभूषेत धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक चित्ररथासह, ढोल ताशा, लेझीमच्या तालात सहभागी होणार आहेत. तसेच उलवे येथील स्वागतयात्रा सायंकाळी ४ वाजता शिव शंभो मंदिर, सेक्टर-१८ येथून डेल्टा टॉवर चौक येथे समारोप होईल. यामध्ये ढोल ताशा, झांज पथक, लेझीमच्या ठेक्यात ही मिरवणूक निघणार आहे.

कोपरखैरणे येथे हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने दुपारी ३.३० वाजता स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा मार्ग सेक्टर-१ ते ४ मैदान ते महालक्ष्मी देवी मंदिर असा असणार आहे. यामध्ये महिला मोटरसायकल पथक, वारकरी मंडळ, पालखी सोहळा आणि पारंपरिक वेशभूषेतील सहभागी हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

नेरुळ येथील स्वागत यात्रा सकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर चौक (साईबाबा हॉटेल) येथून श्री स्वामी समर्थ मठ मार्गे पारंपरिक रथासह निघेल. ऐरोलीतील यात्रा सकाळी ७ वाजता सिद्धिविनायक मंदिर, सेक्टर-१० येथून सुरू होऊन सेक्टर – ८ तुळजा भवानी मंदिर येथे समारोप होईल. सीबीडी बेलापूर येथे देखील यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत रक्षा मंचतर्फे (कोकण प्रांत) श्री कालीमाता मंदिर सीबीडी सेक्टर-८ बी येथून सकाळी ७ वाजता या यात्रेचा प्रारंभ होईल. श्री शिव साई मंदिर, सीबीडीचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेक्टर-१, महाकाली चौक, सेक्टर ३ ते ६ मार्गे श्री नागेश्वर मंदिर, श्री अलबेला हनुमान मंदिर सेक्टर-२ पर्यंत ही स्वागतयात्रा मार्गक्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे शाहाबाज फणसपाडा येथे जय हनुमान म्युझिकल्स प्रदर्शन तसेच घोडा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वागत यात्रांच्या मार्गावर आकर्षक फुलांची सजावट, रोषणाई आणि ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नवी मुंबईत या भव्य स्वागतयात्रांमुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.