पोटॅशियमच्या औषधी बियाविक्रीचा व्यवसाय करणाच्या बहाण्याने मुंबईतील एका व्यावसायिकाकडून तब्बल २४ लाख ६५ हजार रुपये उकळणाऱ्या नायजेरियन टोळीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून रोख रक्कम तसेच मोबाइल फोन असा ८ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. या टोळीने अशाच पद्धतीने अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता असून त्यानुसार या टोळीची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे परिमंडळ १ चे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. या प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव समीर नागडा असे आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रीती अँडरसन व फेबर ब्राईट या दोघा नायजेरियन नागरिकांनी फेसबुकच्या माध्यमातून समीर यांच्याशी मैत्री केली. त्यांनतर विविध आजारांवर उपयुक्त असलेल्या पोटॅशियम बियाविक्रीचा व्यवसाय करण्यासंदर्भात माहिती देऊन या व्यवसायात चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच पोटॅशियमच्या बियांची विक्री करणाऱ्या लंडनस्थित राजेश शर्मा याच्याशी भांडण झाल्याचे सांगून राजेश शर्मा यांच्याकडून या बिया विकत घेऊन त्यांना कुरियरमार्फत पाठवण्यास सांगितले. त्यानुसार समीर यांनी शर्मा याच्याशी संपर्क साधल्यानंतर त्याने बँक खाते क्रमांक देऊन त्यात १ लाख ६५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. समीरने रोख रक्कम जमा केल्यांनतर शर्मा याने अनिल शर्मा याच्या माध्यमातून पोटॅशियमच्या बिया एका बंद पाकिटात पाठवून दिल्या. त्यानंतर दोन दिवसांनतर फेवर ब्राईट याने समीरची भेट घेऊन बिया तपासून बरोबर असल्याचे सांगून त्यांना आणखी बियांची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे समीर यांनी पुन्हा राजेश शर्मा यांच्याशी पोटॅशियमच्या बियांसाठी संपर्क सांधल्यानंतर शर्माने दुसरा खाते क्रमांक देऊन त्यात २० लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार समीरने २० लाख जमा केल्यांनतर शर्माने बिया न धाडल्याने समीरने त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला. या वेळी शर्माने समीरला आणखी ३ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम घेऊन समीर वाशीमध्ये गेले असताना त्यांच्याकडून पैसे घेण्यासाठी आलेल्या राजू नावाच्या व्यक्तीने पोलिसांची भीती दाखवत समीरजवळ असलेली रोख रक्कम घेऊन बिया न देता पलायन केले. त्यानतर समीर यांनी या टोळीतील सदस्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सगळ्यांचे फोन बंद असल्याचे आढळून आल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रथम दोघांना व नंतर इतर ६ आरोपींनाही अटक केली.
व्यापाऱ्याला फसवणारी नायजेरियन टोळी गजाआड
पोलिसांनी सापळा रचून प्रथम दोघांना व नंतर इतर ६ आरोपींनाही अटक केली.
Written by मंदार गुरव
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 10-12-2015 at 02:21 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nigerian gang arrested by police