अंमली पदार्थ विक्री वितरण आणि सेवन यामध्ये अनेकदा नायझेरियन नागरिकांचा सहभाग समोर आला आहे. नवी मुंबईतही नुकत्याच झालेल्या एका मोठ्या कारवाईत १० लाख ३० हजार रुपयांचे एम डी (मेथाक्युलॉन हस) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका नायझेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील वाशी विभागातील जुहुगाव परिसरात ४ नोव्हेंबर रोजी नायजेरियन नागरिक अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी विभागाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासीत अली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने वाशी जुहूगाव परिसरात सापळा रचला होता. आरोपी किनीची न्वाॅनी ओबोंना (वय ४२) या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले होते. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मेथाक्युलॉन हस (एमडी) नावाचा प्रतिबंधित अंमली पदार्थाचा साठा आढळून आला. १३० ग्रॅम वजनाचा १० लाख ३० हजार रुपयांच्या या अंमली पदार्थांसह एक मोबाइल फोन आणि स्कुटीही पोलिसांनी जप्त केली आहे.
हेही वाचा : नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायाला आणि विकासाला चालना देण्यासाठी समिती
या नायजेरियन नागरिकावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासीतअली सय्यद करीत आहेत.सदर कारवाईत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. पराग सोनवणे, पोलीस कर्मचारी मांडोळे, चौधरी, पवार, गायकवाड, तायडे पवार,अहिरे, बांगर, जगदाळे तसेच प्रशासन कार्यालयातील राजपुत, गागरे आदींचा सहभाग होता.