एकाच कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याच्या पद्धतीवर आयुक्तांची नाराजी
नगरसेवकांच्या शिफारशीनुसार मन मानेल तेथे पेव्हर ब्लॉक, निविदेतील दरवाढ (एक्सलेशन) आणि जागोजागी लागणारे हायमास्ट ही अभियंता विभागातील नागरी कामे नवीन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नजरेत आली आहेत. याचा जाब संबंधित अधिकाऱ्यांना येत्या काळात द्यावा लागणार आहे. अभियंता विभागातील अधिकाऱ्याबरोबर घेतलेल्या बैठकीत मुंडे यांनी नुकतीच नागरी कामांची माहिती घेतली. त्यात त्यांनी कंत्राटदारांना मागील अनेक वर्षे एक्सलेशनच्या नावाखाली देण्यात येणाऱ्या करोडो रुपयांच्या वाढीव दरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नवी मुंबई पालिकेतील गेली वीस वर्षांचा कारभार रामभरोसे पद्धतीने चालविला गेला असल्याचे दिसून येते. अभियंता विभागाकडून शहरातील स्थापत्य नागरी कामे केली जात असून सर्वाधिक निधी या विभागासाठी ठेवण्यात येत आहे. या निधीचा मोठय़ा प्रमाणात दुरुपयोग झाल्याची माहिती मुंडे यांच्याकडे असून त्यांनी कंत्राटदारांना देण्यात येणारी दरवाढ निधी बाबत शहर अभियंता मोहन डगांवकर यांना काही तांत्रिक प्रश्न विचारले आहेत. देशातील महागाईवर अवलंबून असणाऱ्या या निधीची जादा दरवाढ देताना कधी तरी कंत्राटदाराकडून वजा एक्सलेशन करून घेण्यात आले आहे का, असा सवाल आयुक्तांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे दरवाढ देण्यात आलेल्या मागील पाच वर्षांतील कंत्राटदारांची यादी येत्या काळात चव्हाटय़ावर येणार आहे. अनेक मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्याने त्यांच्या खर्चात वाढ झाली असून यात कंत्राटदाराचे चांगभलं करून देण्यात आले आहे. नवी मुंबई पालिकेत विहित कालावधीत पूर्ण झालेला एकही मोठा प्रकल्प नाही. त्यामुळे महागाईची बोंब ठोकून कंत्राटदार दरवाढीचा निधी पदरात पाडून घेत आहेत. यात पालिकेची करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. एक्सलेशनमध्ये कंत्राटदारा बरोबरच स्वत:चे चांगभल करणारे अधिकाऱ्यांनी पेव्हर ब्लॉकचा तर गोरख धंदा सुरू केलेला आहे. देशाच्या महालेखापरीक्षकांनी ताशेरे ओढल्यानंतरही नवी मुंबईत जिकडे तिकडे चोहीकडे पेव्हर ब्लॉकेच पेव अशी स्थिती निर्माण झाली आहे. नगरसेवकांच्या शिफारशी वरुन गृहनिर्माण सोसायटय़ा, बैठय़ा घरांच्या असोशिएशन यांच्या परिसरात पेव्हर ब्लॉक लावण्यात आलेले आहेत. पेव्हर ब्लॉकची मागणी लक्षात घेऊन काही अधिकाऱ्यांनी भागीदारीत हा व्यवसायदेखील सुरू केलेला आहे.
एका वर्षांत पदपथावरील पेव्हर ब्लॉक बदलून देणे हा तर अभियंता विभागाचा आवडते काम असल्याने अनेक पेव्हर ब्लॉकची अदलाबदल करून पदपथ बांधण्यात आलेले आहेत. दहा लाखांच्या आतील अनेक कामे काढून ही पेव्हर ब्लॉकची कामे करण्यात आलेली आहेत. याशिवाय विद्युत विभागाने मन मानेल त्या ठिकाणी हायमास्ट लावले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा