नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःच्या १४ रोपवाटिका आहेत. या सर्वांची अतिशय दुरवस्था झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ‘माझी वसुंधरा उपक्रमा’अंतर्गत सर्व रोपवाटिका कात टाकत आहेत. साफसफाई, पाण्याची सोय, तसेच मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड केली जात आहे. त्यामुळे रखरखीत उन्हाळ्यात रोपवाटिकेत आल्हाददायक दृश्य दिसत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठ नोडमध्ये चौदा रोपवाटिका आहेत. मात्र दुर्लक्ष झाल्याने जवळपास सर्व रोपवाटिका भकास अवस्थेत होत्या. जागोजागी कचरा, माजलेले गवत , पाण्याविना वाळलेली रोपे, रोपांसाठी केलेले गाळे तुटलेल्या अवस्थेत, रोपांच्या मातीचे वापराविना विस्कटलेले ढिगारे, अशी रोपवाटिकांची अवस्था होती. उद्यान विभागाचा कार्यभार काही आठवड्यांपूर्वी किसन पलांडे यांच्याकडे आल्यावर त्यांनी रोपवाटिकांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर सूत्रे हलली आणि रोपवाटिका बहरू लागल्या.
दोन तीन आठवड्यांपूर्वी शंभर-सव्वाशे रोपे असणाऱ्या रोपटिकेत आता तब्बल सव्वीस हजारांपेक्षा अधिक प्रकारची रोपे आली आहेत. यात काही मागवण्यात आली आहेत तर अनेक रोपांचे पुनरुज्जीवन करण्यात यश आले आहे. रोपवाटिकेतील मोठ्या प्रमाणात फुलझाडे लावण्यात आली आहेत. झाडांची निवड करताना नवी मुंबईतील हवामानात रुजतील अशा झाडांची निवड करण्यात आली असून यात कदंब, आंबा, सीताफळ, आवळा, कांचन बदाम, बकुळ अशी विविध देशी झाङे आहेत. तर फुलझाडांमध्ये गुलाब, मोगरा, झेंडू, चमेली, जाई जुई शेवंती, आदी झाडांचा समावेश आहे.
रोपवाटिकेमध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा केली जात आहे. वाशी सेक्टर आठ येथील अतिशय वाईट अस्वस्थेतील रोपवाटिका आता टवटवीत झाली आहे. त्याचप्रमाणे अन्य ठिकाणाच्या रोपवाटिका कात टाकणार आहेत. सध्या एकूण सव्वीस हजार रोपे असली तरी त्यात अजून मोठ्या प्रमाणात वाढ केली जाणार आहे. माझी वसुंधरा उपक्रम अंतर्गत शहरातील सर्व रोपवाटिका सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याला पाणी, खत, उपयुक्त ठरेल अशी माती याची पूर्तता करण्यात येत आहे. त्या शिवाय देखभालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. देशी फुलझाडे, झाडे यांना प्राधान्य देत जोपासना केली जात आहे.किसन पलांडे, उपायुक्त, उद्यान विभाग,