नवी मुंबई –  नवी मुंबई शहरात विविध विभागात बेकायदा फेरीवाल्यांचे बस्तान दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे महापालिकेने काही ठिकाणी खाऊगल्लीसाठी सुव्यवस्थितपणे छोट्याशा गाळ्यांची व्यवस्था केली आहे. बेलापूर विभागात सेक्टर ११ परिसरात अत्यंत जुनी खाऊगल्ली असून या गाळेधारकांनी मात्र नियम धाब्यावर बसवत व्यवसाय करत आहेत. या गाळेधारकांनी  बेकायदा हातपाय पसरी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे या ठिकाणच्या मनमानी कारभाराबाबत पालिका विभाग अधिकार  शशिकांत तांडेल यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली आहे.नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेलापूर सेक्टर ११ परिसरात नवी मुंबई महापालिकेचे जेथे  जुने मुख्यालय होते. त्याच परिसरात सरोवर विहारकडे जाताना सेक्टर ११ येथे खाऊगल्ली आहे. या ठिकाणी अनेक गाळे असून सध्या या ठिकाणी गाळेधारकांनी दुकानाबाहेर खुलेआमपणे व्यवसाय सुरु केला असून या ठिकाणी सुरक्षिततेबाबत सर्व नियम धाब्यावर बसवले होते. याबाबत लोकसत्ताने आवाज उठवला होता.

बेलापूर सेक्टर ११ या परिसरात विविध बॅंका ,तसेच विविध कार्यालये आहेत. पालिका तसेच सिडकोचेही कार्यालय याठिकाणी असून या ठिकाणी दुपारच्या सत्रात येथे खूप मोठी गर्दी असते. अतिशय छोट्या गाळ्यांमध्ये येथे व्यवसाय केले जातात. परंतू अनेक गाळेधारकांनी या ठिकाणी चक्क दुकानाच्या बाहेर टेबल, खुर्च्या टाकून जागा अडवल्या होत्या. याच ठिकाणी चहापासून ते विविध नाष्ट्याचे पदार्थ येथे उपलब्ध होतात. परंतू सुरक्षिततेच्या बाबतीत सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र असून पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र होते. या  ठिकाणी अनेकांनी दुकान पोटभाड्याने दिले असून छोट्याशा जागेत विविध व्यवसाय केले जात आहेत.  पदार्थ निर्मितीसाठी  आवश्यक असलेली स्वच्छता तसेच सुरक्षा या ठिकाणी नसल्याने पालिकेने या ठिकाणी योग्य ती सुरक्षेबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे.  नवी मुंबईत अनेक ठिकाणी तसेच रेल्वेस्थानकाच्या परिसरात अनेक फेरीवाल्यांचे साम्राज्य असून ते मनमानी पध्दतीने जागा अडवतात. तर या बेलापूर येथील खाऊगल्लीत  दुकानदारांची हातपाय पसरी सुरु असून सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.  बेलापूर विभाग कार्यालयापासून काहीशा अंतरावर असलेल्या ठिकाणी सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

बेलापूर सेक्टर ११ येथील खाऊगल्लीची पाहणी करण्यात आली असून नियमबाह्य असलेल्या गोष्टींवर कारवाई करण्यात आली. तसेच सुरक्षिततेच्या व ज्वलनशील पदार्थांच्याबाबत  नियमबाह्य साहित्य जप्त  करण्यात आले आहे. शशिकांत तांडेल, विभाग अधिकारी, बेलापूर विभाग