नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता करावरील थकीत रक्कमेवरील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर अभय योजना सुरू केली असताना दुसरीकडे पाणी देयकांवरील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर ५० टक्के सूट देण्याबाबतची अभय योजना लागू केली आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत ही अभय योजना लागू असेल. नागरिकांनी थकीत पाणी बिल भरण्याचे व अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालिकेने नवी मुंबईतील नागरिकांना केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे थकीत पाणी देयक ग्राहक तसेच मोरबे धरण ते कळंबोली दरम्यान असलेल्या मुख्य जलवाहिनीवरील ग्रामपंचायतींकडील थकीत पाणी देयक ग्राहक यांना ही सवलत देण्यात आली आहे. थकीत पाणी देयक रक्कमेवरील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.
नवी मुंबई शहराला मोरबे धरणामुळे जलसंपन्न शहर संबोधले जाते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रालगतच्या महापालिकांमध्ये पाण्याच्या टंचाईमुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ नवी मुंबई शेजारील महापालिकेवर आली असताना नवी मुंबई शहराला मात्र सुरळीत पाणीपुरवठा केला जात आहे. जलसंपन्न असलेल्या या शहरात पाणीपुरवठ्याबाबत पालिकाही अत्यंत कोटेकोरपणे काळजी घेत असल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जवळजवळ १ लाख ३८ हजार पाणीग्राहक असून पाणीबिलापोटी पालिकेला वर्षाकाठी १०० कोटी प्राप्त होत आहेत. तर पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात पाणीबिलापोटी वार्षिक १४० कोटी जमा होण्याचे लक्ष ठेवले आहे. अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता