बाबू गेनू सैद मैदानावर पालिकेकडून उद्यानाची निर्मिती; नागरिकांचा विरोध
सानपाडा सेक्टर ८ येथील भूखंड क्रमांक १ येथील बाबू गेनू सैद मैदानात पालिकेने लावलेल्या उद्यानाच्या नामफलकावरून सध्या वादंग सुरू आहे. १२ डिसेंबर २००७ साली तत्कालीन महापौर अंजनी भोईर यांच्या काळात पालिकेने या भूखंडाचे हुतात्मा बाबू गेनू सैद मैदान असे नामकरण केले होते. मात्र सिडकोने हा भूखंड पालिकेला हस्तांतर करताना उद्यान प्रयोजनासाठी केला असल्याने त्या अनुषंगाने ठेकेदाराने येथे काम सुरू केले आहे. त्यामुळे वर्षांनुवर्ष असलेले हे मैदान आता उद्यान बनविण्याचा घाट पालिकेकडून घातला जात असल्याने या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
सानपाडा येथील बाबू गेनू मैदानात वर्षांनुवर्ष दहीहंडी, हरिनाम सप्ताह, गणेशोत्सव, शिवजयंती तसेच विभागातील बहुतेक सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र आता या मैदानावरच पालिकेने उद्यानाची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. तशा आशयाचा फलकही ठेकेदारामार्फत या ठिकाणी लावण्यात आला आहे. त्यामुळे मैदानाच्या जागेवर उद्यान करण्याचा पालिकेचा डाव हाणून पाडण्यासाठी या प्रभागातील नागरिक एकवटले आहेत. यासाठी मैदान बचाव कृती समिती गठित करताना पालिका आयुक्त आणि महापौर यांच्याशी बाबू गेणू मैदानासाठी पत्रव्यवहारदेखील सुरू आहे. मात्र या मैदानात पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिकेने गटाराचे काम हाती घेतले आहे. तसेच उद्यानाची सुधारणा असा फलक लावल्यामुळे पालिका या मैदानाचे उद्यान करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने नागरिकांचा या निर्णयाला विरोध आहे. त्यामुळे या मैदानांवरून वादंग होण्याची चिन्हे आहेत.
माझ्या कार्यकाळात तत्कालीन महापौरांच्या उपस्थितीत या ठिकाणचे नामकरण पालिकेने मैदानात केले. मात्र १० वर्षांनंतर आता पालिका या ठिकाणी मैदानाऐवजी उद्यानाची निर्मिती करत आहे. वर्षांनुवर्ष येथील नागरिकांनी या ठिकाणाचा वापर मैदान म्हणून केला असल्याने नागरिकांच्या भावनांचा विचार करूनच पालिकेने निर्णय घ्यायला हवे.
-दिलीप बोऱ्हाडे,, माजी नगरसेवक.
या मैदानावर वर्षांनुवर्ष हरिनाम सप्ताह होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावना या मैदानाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे पालिकेने येथे उद्यान बनविण्याचा घाट घालू नये. हे मैदान, असेच राहावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
-नारायण भोर, अध्यक्ष, अखंड हरिनाम सप्ताह, सानपाडा.
सिडकोकडून हा भूखंड पालिकेकडे हस्तांतर होताना उद्यान म्हणून झाला आहे. या ठिकाणी सध्या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटाराचे काम सुरू आहे.
-मनोज पाटील, कार्यकारी अभियंता, मनपा.
सुरुवातीला मालमत्ता विभाग स्वतंत्र नसल्याने काही ठिकाणी उद्यानाच्या भूखंडावर मैदानाचे नामकरण झाले आहे. बाबू गेणू मैदानाबाबत देखील असेच झाले आहे. याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
-दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त परिमंडळ १, मनपा.