अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्रकल्प अहवाल प्राप्त , निविदा प्रक्रियेला विलंब कशासाठी
नवी मुंबई– संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान महाराष्ट्रभर व्यापक स्वरुपात स्व. आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या स्पर्धेत नवी मुंबई महापालिकेने सलग पहिले ३ वर्ष महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळवला. यंदा देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महापालिकेला मिळाला असून नवी मुंबई महापालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्याची तयारी सुरु केली असून आधुनिक पध्दतीचा व ई वाहतूकीला प्राधान्य देण्याच्या विचारात महापालिका आहे. एकीकडे शहरासाठी कचरा वाहतूक व संकलनासाठी वारंवार जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ दिली जात आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्रकल्प अहवालही पालिकेला प्रप्त झाला आहे. परंतू त्या प्रकल्प अहवालाच्या मंजुरीनंतर पालिकेला या कामाबाबत निविदा काढता येणार आहे. त्यामुळे या कामाच्या ठेक्यासाठी राबवण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेला विलंब कशासाठी प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे पालिकाही कचरा वाहतूक संकलनासाठी कधी निविदा राबवणार व सततची मुदतवाढीची घंटा थांबणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई: तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अटकेत; पनवेलमधील धक्कादायक घटना
शहर स्वच्छतेबरोबरच कचरा वर्गीकरणाकडे पालिकेने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. नवी मुंबई महापालिकेने कचरा वाहतूक व संकलनासाठी मार्च २०१५ ते मार्च २०२२ पर्यंत शहरातील कचरा वाहतूक व संकलनाच्या ठेकेदाराला काम दिले होते.परंतू संबंधित ठेकेदाराची मुदत गेल्यावर्षीच संपल्याने पालिकेने १ वर्षासाठी याच ठेकेदाराला कामासाठी मुदतवाढ दिली होती. परंतू १ वर्षासाठी दिलेली मुदतवाढही पुढील आठवड्यात संपत असल्याने व अद्याप प्रकल्प अहवालच मंजूर केला नसल्याने आता पालिकेला पुन्हा या ठेकेदाराला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत मे. ए.जी एनव्हायरो ठेकेदाराला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेचा कचरा वाहतूक व संकलनासाठीचा विस्तृत सविस्तर असा प्रकल्प अहवाल पालिकेला प्राप्त झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.हा विस्तृत प्रकल्प अहवाल अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्यावतीने बनवण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्यावतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असताना दुसरीकडे पालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. २०१५ ते २०२२ पर्यंत असलेल्या ठेकेदाराची मुदत संपल्याने यंदा कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवली जाणार आहे.आगामी काळात संकलन व वाहतूक यासाठी नव्याने होणाऱ्या निविदा प्रक्रियेमध्ये कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवून विविध पध्दतीचा कचरा वेगळा करण्याचा पालिकेचा मानस आहे. तसेच २०१५ मध्ये एकत्रित कचरा संकलन केले जात होते.परंतू नव्याने काढण्यात येणाऱ्या कामामध्ये शहरात ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाप्रमाणेच घरगुती घातक कचरा वर्गीकरण तसेच सुका व घातक कचऱ्याच्या वर्गीकरणाबरोबरच नव्याने प्लास्टिक, लाकूड, काच, धातू अश्या कचऱ्याचे वर्गीकरण करुन कचरा संकलन केले जाणार आहे. तसेच एकीकडे सर्वत्र इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर सुरु झाला असताना कचरा वाहतूकूसाठीही ईलेक्ट्रीक गाड्यांचा वापर करण्याबाबतही विचार केला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवी मुंबई महापालिकाक्षेत्रातील कचरा वाहतूकीसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल अखिल भारतीय स्वराज्य स्थानिक संस्थेच्या सहकार्याने तयार करण्यात आला असून त्यांचा सविस्तर अभ्यासानंतर त्याला पालिकेकडून मान्यत दिली जाणार आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबले आणि सहा सात गाड्यांना उडवले ; एक जखमी
नवी मुंबई शहरात शहर सुशोभिकरणाप्रमाणेच पर्यावरणास पूरक अशा अनेक सुधारणा केल्या जाणार आहेत. करोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर आता ‘रस्त्यावर शून्य कचरा ‘ नजरेसमोर ठेवून व ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे पालिकेने बंधनकारक करण्यात आलेले आहे. पालिकेत प्रशासक म्हणून आयुक्त कारभार पाहत असल्याने नव्याने काढण्यात येणाऱ्या कचरा वाहतूक व संकलनाबाबत पालिकेने व्यापक नियोजनाचे लक्ष ठेवले आहे.त्यामुळे आगामी कचरा वाहतूक व संकलन निविदा अनेक करोडोंच्या घरात जाणार असून शहराला देशात स्वच्छतेबाबत मिळालेला नावलौकीक टिकवण्यासाठी व सातत्याने वाढवण्यासाठी पालिका योग्य ती खबरदारी घेणार असल्याचे चित्र आहे. तसेच कचरा वाहतूक व संकलनाच्या निविदा प्रक्रियेबाबत अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एक कमिटीही तयार करण्यात आली आहे. शहरातील पालिकेच्या सोयीसुविधांमध्ये अत्यंत महत्वाचा ठरणारा विभाग म्हणजे घनकचरा विभाग त्यामुळे या विभागाला मह्त्व असून प्रकल्प अहवालात अधिकाधिक नाविण्यापूर्व व तंत्रज्ञानयुक्त गोष्टींचा बदल करण्यात येणार आहे. २०१५ पासूनचे कचरा वाहतूक व संकलनाबाबतची कामाची मुदत संपली असून नव्याने निविदा प्रक्रिया राबवताना कचरा वर्गीकरण व संकलनाबाबत अत्याधुनिक पध्दतीचा अवलंब केला जाण्यचा प्रयत्न असून निविदेबाबत व कचरा वाहतूक व संकलनाबाबत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्याने पालिका आगामी काळात कचरा वाहतूक निविदेबाबत गंभीर असल्याचे चित्र आहे.
ठेकेदाराला मुदतवाढ व कामाच्या किंमतीत फरक नाही….
एखाद्या कामाचा ठेका संपल्यानंतर त्याला मुदतवाढ द्यावयाची असेल तर आहे त्या दरातच मुदतवाढ दिली जाते. त्यामुळे पालिकेला याबाबत मोठा आर्थिक फरक द्यावा लागत नसला तरी अधिक काळासाठी नियमानुसार नव्याने निविदा राबवूनच काम करणे शहरासाठी व दर्जेदार कामासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे पालिका लवकरात लवकर निविदा काढणार का याकडे आता लक्ष लागले आहे.
शहरात अत्याधुनिक पध्दतीने कचरा वाहतूक व संकलनासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रकल्प अहवाल पालिकेला प्राप्त झाला आहे. ठेकेदाराला सद्या सुरु असलेल्या ठेक्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे. परंतू दुसरीकडे नवी निविदा राबवण्याबाबतही पालिका प्रयत्नशील असून प्रकल्प अहवाल मंजूर झाल्यानंतर वेगवान प्रक्रिया राबवून कचरा वाहतूक व संकलन निविदा आयुक्तांच्या परवानगीने काढण्यात येणार आहे.
बाबासाहेब राजळे, उपायुक्त घनकचरा विभाग