उपाययोजनांसंदर्भात उच्च न्यायालयाच्या विचारणेनंतर पालिकेची माहिती

नवी मुंबई : पालिका क्षेत्राला लाभलेल्या ६० किलोमीटर अंतराच्या सागरी किनाऱ्यावरील कांदळवनाचे संरक्षण करण्यासाठी पालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यात कांदळवनाकडे जाणाऱ्या मार्गात चर खोदणे, गतिरोधक बसविण्यासह नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी देताना नवी मुंबई पालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती मागवली आहे.

नवी मुंबई पालिकेला दिवा ते दिवाळ्यापर्यंत खाडीकिनारा लाभलेला आहे. उरणपासून सुरू होणाऱ्या या किनाऱ्याचे अंतर साठ किलोमीटपर्यंत आहे. सुनामीनंतर खारफुटीचे महत्त्व अधोरेखित झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने कांदळवन आणि खारफुटी यांचे संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणांवर टाकलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने क्षेत्रातील खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीच्या संवर्धनासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. नवी मुंबईतील आगरी-कोळी समाज हा स्वयंपाकासाठी मोठय़ा प्रमाणात खारफुटीतील झाडांचा सरपणासाठी वापर करीत होता. ते प्रमाण आता शून्यावर आले आहे. पालिका वनसंरक्षण विभागाने या संदर्भात केलेल्या जनजागृतीला या समाजाने चांगला प्रतिसाद दिलेला आहे. पालिकेने आणि वन विभागाने सर्व खाडीकिनाऱ्यांवर      खारफुटी संवर्धनाच्या जनजागृतीचे फलक लावले आहेत. खाडीकिनाऱ्यांवर ही वृक्षतोड करण्यासाठी ग्रामस्थांनी वाहने घेऊन जाऊ नये यासाठी चर आणि गतिरोधक लावण्यात आलेले आहेत. बांधकामातील टाकाऊ साहित्य (डेब्रिज) खाडीकिनारी टाकले जात होते.  आता त्याच्यावर निर्बंध आले आहेत. मुंबईतून हे प्रमाण सर्वाधिक होते. पालिकेच्या दक्षता पथकाने यावर नियंत्रण मिळविले आहे.

धारण तलाव स्वच्छतेची गरज

भरतीच्या पाण्याला रोखण्यासाठी डच पद्धतीने धारण तलाव (होल्डिंग पॉण्ड) बांधलेले आहेत. त्यात खारफुटीची जंगले तयार झाली आहेत. त्यामुळे धारण तलावांची निगा राखता येणे शक्य होत नाही. त्यातही न्यायालयाच्या आदेशामुळे धारण तलाव स्वच्छ करता येत नाहीत. त्यामुळे  पावसाचे पाणी तुंबण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. समुद्राच्या लाटांपासून वाचविणारी खारफुटी पावसात संकट म्हणून उभी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खारफुटीचे संवर्धन आणि संरक्षण करून या धारण तलावांमधील गाळ काढणे आवश्यक आहे.

कांदळवन संरक्षणासाठी पालिकेने अनेक उपाययोजना केलेल्या असून वन विभागाच्या वतीने ही मोहीम सुरू आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा लवकरच घेतला जाईल.

सुरेंद्र पाटीलशहर अभियंता, नवी मुंबई पालिका

Story img Loader