मुंबई पालिकेनंतर राज्यात स्वत:चे धरण विकत घेणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या उंबरठय़ावर पाणीटंचाईचे संकट येऊन ठेपल्याने धसका घेतलेल्या पालिका प्रशासनाने मोठय़ा प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. जनजागृती केल्यानंतरही नवी मुंबईकर पाण्याचा अपव्यय आटोक्यात आणू शकले नाहीत तर पालिकेला एका महिन्यानंतर नाईलाजास्तव चोवीस तास पाणीपुरवठय़ाच्या सेवेवर काट मारावी लागणार आहे. पालिकेच्या मोरबे धरणात सध्या केवळ १०८ एमसीएम (मिलेनियम क्युबिक मीटर) पाणीसाठा असून तो केवळ मार्चअखेपर्यंत पुरणारा आहे. त्यामुळे जलसंपन्न पालिकेच्या काळजात धडकी भरली आहे. गतवर्षी हा साठा याच दिवसात १८४ एमसीएम होता.
पिण्याच्या पाण्यात स्वावलंबी असावे, यासाठी नवी मुंबई पालिकेने जलसंपदा विभागाकडून दहा वर्षांपूर्वी खालापूर तालुक्यातील मोरबे धरण ४५० कोटी रुपयांना विकत घेतले. त्यामुळे १४ ( यात दोन लाख फ्लोटिंग लोकसंख्या आहे) लाख लोकसंख्येला मुबलक पाणीपुरवठा होत आहे. पालिका दररोज ४२० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा मोरबे धरणातून करते. त्यातील ५५ दशलक्ष लिटर पाणी सिडकोच्या खारघर, पनवेल, कामोठे या भागाला दिले जात आहे. पालिका एमआयडीसी भागासाठी बारवी धरणातील पाणीही विकत घेत आहे. पाणीसाठा जास्त आणि लोकसंख्या तुलनेने कमी असल्याने येथील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेली १५ वर्षे चोवीस तास पाणी देण्याचे वचन दिले. या चोवीस तासांच्या पाणीपुरवठय़ासोबत तीस रुपयांत एक हजार लिटर पाणी स्वस्त आणि मुबलक प्रमाणात देण्याचे वचन दिले गेले. त्यामुळे राज्यातील कोणत्याही शहरात होत नाही इतका पाण्याचा अपव्यय नवी मुंबईत केला जात आहे. येथे पालिकेच्या उद्यानांनाही पिण्याच्या पाण्यांनी शिंपले जात आहे तर पिण्याजोगे केलेले सांडपाणी खाडीत सोडले जात आहे. वाहने धुण्यावरही धो धो पाणी वाया जात असल्याचे चित्र नेहमीचेच आहे. पावसाने ओढ घेतल्याने राज्यात दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागांत एकवेळचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. पुणे पालिकेने एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून मुंबई पालिकेत पाणीकपातीवरून रणकंदन सुरू झाले आहे. राज्यात जलसंपन्न पालिका म्हणून नावलौकिक कमविलेल्या नवी मुंबई पालिकेनेही पाणीटंचाईची भीती ओळखली आहे. त्यामुळे पाणी विभाग व जनसंपर्क विभागाने पाण्याची बचत कशी करावी याच्या उपाययोजना नागरिकांना सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सोशल मीडिया, वृत्तपत्रे व फलक यांच्याद्वारे नागरिकांना पाणीबचतीचे धडे दिले जात आहेत. यात शॉवरऐवजी बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करावी, दात घासताना व दाढी करताना बेसिनचा नळ बंद करावा यासारख्या छोटय़ामोठय़ा १४ सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकीकडे ही जनजागृती केली जात असताना पाण्याचा जास्त वापर करणाऱ्या सोसायटय़ांना नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, तर नळाच्या पाण्याने रस्ते, पार्किंग जागा, गाडय़ा धुणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जात आहे. या जनजागृतीचा किती परिणाम झाला आहे हे एका महिन्यात पाहिले जाणार असून त्यानंतर २४ बाय ७ पाणीपुरवठय़ाबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईतील पाणीटंचाईचा भविष्यातील विचार करताना काही ठोस उपाययोजना करण्याची वेळ आता आली आहे. नवी मुंबईत पाण्याचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. एका कुंटुबाला सर्वसाधारणपणे एक हजार लिटर पाणी लागते. ह्य़ापेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्या सोसायटय़ांना पाणीकपातीशी सामना करावा लागणार आहे. या सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबाबतचे प्रबोधन रहिवाशांना करण्याची आवश्यकता आहे. विद्यमान पाणीसाठा आणखी साडेसहा महिने पुरणार आहे. त्यामुळे पाणीबचतीचा मंत्र सर्वानी जपण्याची गरज आहे.
अरविंद शिंदे, पाणीपुरवठा विभागप्रमुख, नवी मुंबई पालिका