|| पूनम सकपाळ
उद्घाटनाअभावी घणसोलीतील केंद्राची तीन मजली इमारत तीन महिन्यांपासून बंद
नवी मुंबई : नवी मुंबईतील निराधार नागरिकांच्या हालांना सध्या पारावर उरलेला नाही. त्यांना कडाक्याच्या थंडीचा मारा सहन करीत रात्र रस्त्यावर काढावी लागत आहे. अशा बेघरांच्या सोयीसाठी नवी मुंबई महापालिकेने बांधलेले रात्र निवारा केंद्र बांधून तयार असूनही ते अद्याप खुले करून देण्यात आलेले नाही.
शहरातील बेघरांना रात्र उघडय़ावर काढण्याची वेळ येऊ नये, यासाठी पालिकेच्या वतीने घणसोली सेक्टर -४ येथे सव्वादोन कोटी रुपये खर्चून तीन मजली रात्र निवारा केंद्र बांधण्यात आले आहे. मात्र उद्घाटनाअभावी ते खुले करण्यात आलेले नाही. केंद्राचे काम तीन महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे.
थंडीच्या दिवसांत बेघरांना रात्रीसाठी ही सोय करून देण्यात आली आहे. मात्र घणसोली आणि कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेर निराधार नागरिक रस्त्यावर रात्र काढत आहेत. सध्या बेलापूरमधील आग्रोळी उड्डाणपुलाखाली रात्र निवारा केंद्र सुरू आहे. त्या ठिकाणी आधारकार्ड दाखवून निर्वासितांना झोपता येते. परंतु घणसोलीतील निराधार केंद्रांतील या लाभापासून वंचित आहेत.
घणसोलीत उद्घाटन का नाही?
पालिकेने याआधी निवडणूक आचारसंहितेत अडकलेल्या तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी बरेच प्रकल्प उद्घाटनाविना खुले केले आहेत. तर घणसोलीतील रात्र निवारा केंद्र खुले करण्यास काय अडचण आहे, असा सवाल केला जात आहे.
घणसोली येथील रात्र निवारा केंद्र मुलींसाठीही उपयोगी पडेल का? याची तपासणी सुरू आहे. आयुक्तांसोबत त्याबाबत चर्चा सुरू आहे. धोरण स्पष्ट होताच उद्घाटन पार पडेल.- क्रांती पाटील, पालिका उपायुक्त, समाज विकास विभाग