नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीत सहमती

नवी मुंबई : राज्याची सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये या प्रयोगाचा अंक सुरू झाला आहे. याचा पहिला प्रयोग एप्रिलमध्ये होणाऱ्या नवी मुंबई पालिका निवडणुकीत होत आहे. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी १११ प्रभागांपैकी शिवसेना ५०, राष्ट्रवादी ४० आणि शिल्लक २१ प्रभाग काँग्रेस या तीन पक्षांत वाटप करण्याचे सूत्र ठरले आहे. यात १४ जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात  रस्सीखेच सुरू आहे.

नवी मुंबई पालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात होणार आहे. अगोदर बहुसदस्यीय पद्धतीने ठरलेली ही निवडणूक आता एकसदस्यीय पद्धतीने होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी चार प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात पालिकेतील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग यशस्वी करण्याठी शिवेसना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावर अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व जबाबदारी सोपविली आहे, तर शिवसेनेच्या वतीने उपनेते विजय नाहटा बाजू सांभाळत आहे. काँग्रेसच्या वतीने स्थानिक अनिल कौशिक यांनी या चर्चेतील बैठकांमध्ये रस घेतला आहे. भाजप अर्थात माजी मंत्री गणेश नाईक यांना पालिका सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या तीन पक्षांनी महाविकास आघाडी करण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे.

या प्रयोगात शिवसेना हा मोठय़ा भावाची भूमिका पार पाडणार असल्याने त्यांना १११ पैकी ५० प्रभाग देण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दाखवली आहे, परंतु शिवसेनेला आणखी थोडय़ा जागांची अपेक्षा आहे. बहुमतासाठी ५७ हा आकडा असल्याने शिवसेना जास्तीत जास्त जागा लढविण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी यात निर्णायक भूमिकेत असल्याने त्यांनी १११ पैकी ४० जागांवर समाधान मानण्याची तयारी केली आहे. काँग्रेसचे सध्या केवळ सात नगरसेवक आहेत. त्यांना शिल्लक २१ निवडून येणारे प्रभाग दिले जाणार आहेत. निवडून येणे हा निकष या उमेदवारी वाटपात ठेवला जाणार आहे. १४ प्रभागांत रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या १४ प्रभागांवर दावा आहे, मात्र पण यातून मार्ग काढला जाईल असे या नेत्यांचे म्हणणे आहे.

प्रभाग आरक्षण पुढील महिन्यात

नवी मुंबई : मागील महिन्यात ऐनवेळी रद्द झालेले नवी मुंबई पालिकेचे प्रभाग आरक्षण आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबई पालिका प्रशासनाच्या वतीने प्रभागांचे प्रारूप कोकण विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आले आहे. ते पुढील आठवडय़ात राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविले जाईल. ही प्रक्रिया या महिन्यात पूर्ण करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात प्रभाग आरक्षण आणि इतर आरक्षण होणार आहे. पालिकेची यापूर्वीची निवडणूक आरक्षण हे सात फेब्रुवारी रोजी झाले होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात हे आरक्षण झाल्यास पालिकेकडे दोन महिन्याचा कालावधी राहील.

नवी मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याबाबत लवकरच तिन्ही पक्षातील वरिष्ठ मंडळी एकत्रित बसून याबाबत वाटाघाटी करणार आहेत. – अनिल कौशिक, जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई काँग्रेस

नवी मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडी करण्याचे निश्चित झाले आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ  जाहीर करतील. -विजय नाहटा, उपनेते, शिवसेना

 

नवी मुंबईसाठी जवळपास महाविकास आघाडी झालेली आहे. त्याची औपचारिक घोषणा करण्याची केवळ शिल्लक असून जवळपास प्रभाग वाटपांचे सूत्र ठरले आहे. – अशोक गावडे, अध्यक्ष, नवी मुंबई राष्ट्रवादी

Story img Loader