नवी मुंबई : शहरात नव्या मालमत्तांचा शोध घेऊन उत्पन्नात भर पाडण्यासाठी नवी मुंबई महापालिकेमार्फत वेगवेगळे उपाय आखले जात असले तरी येत्या आर्थिक वर्षात मालमत्ता करवसुलीचे एक हजार कोटी रुपयांचे लक्ष्य गाठण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे असणार आहे. आर्थिक वर्षाला सहा महिने होऊन गेले तरी मालमत्ता कराची ३५० कोटी रुपयांची वसुली या विभागाने केली आहे. अखेरच्या काही महिन्यांमध्ये या वसुलीचा वेग वाढतो हे जरी स्पष्ट असले तरी महापालिका हा पल्ला कुठपर्यत गाठू शकेल या विषयी साशंकता व्यक्त होत आहे.
मालमत्ता कर हा नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. गेल्या आर्थिक वर्षात महापालिकेने ७१६ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली होती. २०२२-२३ या आर्थिक वर्षापेक्षा गेल्यावर्षी ८३.६६ कोटींनी अधिक मालमत्ता कर वसूल करण्यात आला होता. या आर्थिक वर्षात पालिकेने एक हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य समोर ठेवले आहे. आतापर्यंत मालमत्ता कर विभागाने ३५० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. यंदा महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. थकबाकी रकमेनुसार उतरत्या क्रमाने याद्या तयार करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…बेटासाठी नव्या रस्त्याचा खटाटोप नवी मुंबईतील पाणथळी, सीआरझेड, तिवरांच्या जंगलातून रस्त्यांची बांधणी?
अभय योजनेचे प्रयोग
मालमत्ता कराची वसुली वाढावी यासाठी महापालिकेने थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली होती. महापालिकेने मागील वर्षी १ ते २० मार्च या कालावधीत थकबाकीच्या दंडात्मक रककमेवर ७५ टक्के सवलत तसेच २१ ते ३१ मार्च या कालावधीत ५० टक्के सवलत लागू केली होती. या योजनेचा लाभ थकबाकीदारांनी मोठया प्रमाणावर घेतला. आठ हजार ७४० थकबाकीदारांनी ११६ कोटी इतकी रक्कम अभय योजनेच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत भरली. यंदा लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीमुळे कर वसुलीवर परिणाम झाल्याचे चित्र असून या आर्थिक वर्षात ३५० कोटींचा मालमत्ता कर वसुल केला आहे.
नवी मुंबईकर नागरिकांनी शहराच्या प्रगतीत आपले योगदान देऊन पालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या व दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी मालमत्ता कर भरणा करावा. यावर्षी १ हजार कोटी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष असून आतापर्यंत ३५० कोटी मालमत्ता कर्ज जमा केला आहे.शरद पवार, उपायुक्त, प्रशासन व मालमत्ता कर विभाग
हेही वाचा…दैनंदिन बाजार धूळखात कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली कोपरखैरणेतील बाजार इमारत वापराविना
मालमत्तांची संख्या
वर्ष २०२३ – ३ लाख ३० हजार
वर्ष २०२४ – ३ लाख ४६ हजार
पालिकेची मागील काही वर्षातील मालमत्ता कर वसुली
२०१८-१९ – ४८१. ४० कोटी
२०१९-२० – ५५८.९१ कोटी
२०२०-२१ – ५२७.८१ कोटी
२०२१-२२ – ५६२.०७ कोटी
२०२२-२३ – ६३३.३६ कोटी
२०२३-२४- ७१६.९७ कोटी
२०२४-२५ १ हजार कोटी वसुलीचे लक्ष्य