नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाणी तपासणीसाठी दोन आठवडे रविवारी विशेष पाणी गुणवत्ता तपासणीत २ हजार पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून नवी मुंबईकरांना स्वच्छ ,शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा केला जात असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे. ९५ नमुने उत्तम असल्याचे विशेष पाणी तपासणीत स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा >>> पनवेल: ६२९ ठिकाणी आरक्षण, २९ गावांच्या विकासासाठी पनवेल महापालिकेचा पहिला प्रारूप विकास आराखडा
पावसाळी कालावधी म्हणून तपासणीत वाढ करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा विभागास दिले होते. त्यास अनुसरून अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे व त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष मोहीम रविवारी ४ व ११ ऑगस्ट रोजी राबविली. या दोन्ही वेळेस नेहमीपेक्षा दहा पट अधिक म्हणजे प्रत्येक रविवारी १ हजारांहून अधिक म्हणजे लागोपाठ दोन रविवारी २ हजारपेक्षा अधिक पाणी नमुने वेगवेगळ्या ठिकाणाहून तपासण्यात आले. महापालिका क्षेत्रातील घरे, सोसायट्या, गावठाण व झोपडपट्टी भाग, वाणिज्य संकुले, शैक्षणिक व इतर संस्था अशा विविध ठिकाणांहून तसेच मुख्य जलवाहिनी, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ अशा ठिकाणांवरूनही पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली.
हेही वाचा >>> शाळांच्या वेळेतील बदल कागदावरच! तूर्त शाळा जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच सुरू राहणार
या गुणवत्ता चाचणीमध्ये पिण्याच्या पाण्यातील विविध घटकांची चाचणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ८ ठिकाणी असलेल्या स्वत:च्या प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेत तसेच कोकण भवन येथील शासनाच्या प्रयोगशाळेमध्ये करण्यात येत आहे.
सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या केंद्र सरकारच्या अभियानांतर्गत लागोपाठ २ आठवडे आयुक्तांच्या निर्देशानुसार रविवारी ही मोहीम राबविण्यात आली. २ हजारपेक्षा अधिक पाणी नमुने तपासण्यात आले असून ९५ टक्के नमुने उत्तम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईकर नागरिकांना स्वच्छ , शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. – अरविंद शिंदे , अतिरिक्त शहर अभियंता, नमुंमपा