विकास महाडिक, नवी मुंबई

शहरात मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारा कचरा आणि रोज रिता होणारा मुंबईतील राडारोडा ही नवी मुंबई महापालिकेची डोकेदुखी दूर करण्यासाठी राडारोडय़ावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी पालिका आठ कोटी रुपये खर्च करणार आहे. ठाणे पिंपरी चिंचवड पालिकांनी केलेल्या खर्चाच्या तुलनेत अतिशय कमी खर्चात नवी मुंबई पालिका हा प्रकल्प उभारणार आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्राला राडारोडय़ाच्या समस्येने गेली अनेक वर्षे हैराण केले आहे. मुंबईत मोठय़ा प्रमाणात सुरू असलेले बांधकाम आणि त्यामुळे निर्माण होणारा बांधकाम कचरा टाकण्यासाठी नवी मुंबई हे मोकळे रान ठरत आहे. नवी मुंबई पालिकेने या राडारोडा वाहून आणणाऱ्या गाडय़ा पकडण्यासाठी दक्षता पथक तैनात केले आहे, मात्र ती देखील निष्प्रभ ठरली आहेत.

नवी मुंबईत येण्यासाठी वाशी, ऐरोली आणि विटावा हे तीन प्रवेशद्वार आहेत. तिथून रात्री राडारोडय़ाची वाहने शहरात घुसतात. यातील काही गाडय़ा पालिकेची परवानगी घेऊन कचरा टाकतात, तर काही गाडय़ा कोणतीही परवानगी न घेताच नवी मुंबईत रित्या केल्या जातात.

शहरात जमीन समतल करण्यासाठी या राडारोडय़ाची आवश्यकता अनेक विकासकांना भासते. महापे येथे एमआयडीसीने अशा प्रकारे हजारो टन राडारोडा मागवून विस्तीर्ण असा खड्डा बुजवला आहे. या ठिकाणी भूखंड तयार करून एमआयडीसी आता ते विकणार आहे. मुंबईतून येणाऱ्या राडारोडय़ाच्या काही गाडय़ा या शिळफाटा भागात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी जातात. तर अनेक गाडय़ा कोणत्याही मोकळ्या जागेवर, पावसाळी नाल्यांत रस्त्यांच्या कडेला रित्या केलेल्या दिसतात. या धंद्यात काही स्थानिक लोकप्रतिनिधींचेही हात ओले होत असल्याची चर्चा आहे. एका गाडीमागे १०० ते २०० रुपये लाच घेतली जात असल्याचे कळते. त्या मोबदल्यात स्थानिक प्रभाग अधिकारी व दक्षता पथकातील कर्मचाऱ्यांना ‘सांभाळले’ जाते. त्यामुळे अनेक उपाययोजना करूनही नवी मुंबईतील राडारोडय़ाची समस्या सुटलेली नाही.

यावर पालिकेच्या अभियंता विभागाने एक नामी शक्कल शोधून काढली आहे. शेजारच्या ठाणे व पिंपरी पालिकेने सुरू केलेला बांधकाम आणि पाडकाम राडारोडा प्रकल्प (कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डिमॉलिशन वेस्ट प्रोजेक्ट) तुर्भे येथील कचराभूमीच्या जागेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आठ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ठाण्यात हाच प्रकल्प २२ तर पिंपरीत ३५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे, मात्र नवी मुंबई पालिकेने प्रकल्पाचा खर्च एक तृतीयांश कमी केला आहे. येत्या दोन महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यानंतर शहरात येणारा राडारोडा अधिकृतरीत्या स्वीकारला जाईल. दिवसाला १५० मेट्रिक टन राडारोडय़ावर प्रक्रिया केली जाणार आहे. रेती, खडी, विटा, सिमेंटचे वर्गीकरण केले जाईल. आणि ते रस्ता बांधणीसाठी वापरले जाईल, असे शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी सांगितले.

नियोजनबद्ध नवी मुंबईतील रस्त्यांच्या कडेला पडलेला राडारोडा विद्रूपीकरणास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करून त्यातील उत्पादनांचा पुनर्वापर केला जाणार आहे. ठाणे व पिंपरी चिंचवडपेक्षा हा प्रकल्प पालिका अतिशय कमी खर्चात उभारला जाणार आहे.

– डॉ. रामास्वामी एन.,आयुक्त, नवी मुंबई पालिका

Story img Loader