नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये यावर्षी ५२४ धोकादायक इमारती असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामध्ये ६१ इमारती राहण्यास योग्य नसल्याचे जाहीर केले आहे. गेल्यावर्षी शहरात एकूण ५१४ धोकादायक इमारतींची यादी पालिकेने जाहीर केली होती. यावर्षी या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
गेल्यावर्षी अतिधोकादायक असलेल्या काही इमारतींचे पुनर्विकासाचे काम सुरू झाल्याचे चित्र आहे. अतिधोकादायक इमारतींमध्ये नागरिक राहत असून, इमारत कोसळून नागरिकांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता असल्याने या इमारती तात्काळ खाली करण्याची उद्घोषणा आज नवी मुंबई महापालिकेने केली आहे.
हेही वाचा… सिडको निर्मित घरात झोपताय पण जरा सावधान, पावसात घरांच्या छताचे प्लास्टर कोसळण्याचा धोका कायम
नवी मुंबई महापालिकेने राहण्यायोग्य नसलेल्या अतिधोकादायक अशा ६१ इमारतींची यादी जाहीर केली आहे. यादी जाहीर केल्यानंतरही नागरिकांनी इमारत खाली न केल्यामुळे आज नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयामार्फत नागरिकांना ४८ तासांमध्ये इमारत खाली करण्याची सूचना देण्यात आली आहे. अन्यथा इमारतींमधील वीज, पाणी व गॅस पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
४८ तासांत अतिधोकादायक इमारती खाली न केल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता या इमारती पालिकेकडून खाली करण्यात येतील असा इशारा नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. संपूर्ण नवी मुंबईत पुढील दोन-तीन दिवसांत इमारत अतिधोकादायक असतानाही नागरिकांचा त्या ठिकाणी असलेला रहिवास याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
हेही वाचा… उरण: पिरवाडी किनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन
महापालिकेच्यावतीने सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्राील एकूण ५२४ इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६४ नुसार धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा ‘सी-१’ प्रवर्गामध्ये मोडणा-या ६१ इमारतीआहेत. तसेच इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-२ ए’ प्रवर्गामध्ये मोडणा-या ११४ इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-२ बी’ प्रवर्गामध्ये मोडणा-या ३०० इमारती असून इमारतीची किरकोळ दुरूस्ती करण्यासारख्या असलेल्या ‘सी-३’ प्रवर्गामध्ये मोडणा-या ४९ इमारतींचा समावेश आहे. अशाप्रकारे एकूण ५२४ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली आहे.
हेही वाचा… उरण : वळग्नीच्या चिवणी माशाचे दर कडाडले, शंभर रुपयांना एक नग
शहरात पावसाला सुरवात झाली असून घरांच्या छताचे प्लास्टर पडण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. नेरुळ सेक्टर २४ येथील अति धोकादायक असलेल्या इमारतीमध्ये नागरीकरहाट असल्याचे दिसून आले असून, याच इमारतीत दोन दिवसापूर्वी घराच्या छताचा प्लास्टरचा मोठा भाग कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. परंतु आता महापालिका अतिधोकादायक इमारतीच्या बाबत सावधान झाल्याचे दिसून येत आहे.
नेरूळ विभाग कार्यालय क्षेत्रात ११ अतिधोकादायक इमारती असून त्या ४८ तासांत नागरिकांनी खाली कराव्यात अन्यथा पालिकेच्यावतीने या इमारतींमधील वीज,पाणी,गॅस पुरवठा कापण्यात येईल अशा माईकद्वारे घोषणा पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. – प्रबोधनकार मावडे, सहाय्यक आयुक्त,नेरुळ विभाग