नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून परिवहनाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. मात्र सध्या बेस्टच्या कमी तिकीट दराच्या स्पर्धेत वाशी-कोपरखैरणे मार्गावरील एनएमएमटीची प्रवासी संख्या कमी आहे. परिणामी उत्पन्नात देखील कमी होत आहे. त्यामुळे एनएमटीने आता या मार्गावरील प्रवासी संख्या वाढवण्यासाठी नियोजन सुरू केले असून लवकरच या मार्गावर वाशी ते कोपरखैरणे दरम्यान वातानुकूलित बस मधून कमीत कमी ५ रुपये ते १५पर्यंत तिकीट दर लागू करण्यात येणार आहे. यामुळे बेस्ट तिकीटच्या दरातच साध्या बस पेक्षा वातानुकूलित बसमधून प्रवासांना प्रवास करण्याची मुभा दिली जाणार आहे, अशी माहिती परिवहन उपक्रमाने दिली आहे.
मागील चार ते पाच वर्षांपासून बेस्टचे तिकीट दर किमान पाच रुपयांवर आले आहेत. त्यामुळे बेस्टच्या बसला वाशी ते कोपरखैरणे मार्गवर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेस्टच्या तुलनेत सध्या एनएमएमटीचे तिकीट दर जादा आहेत, त्यामुळे प्रवासी कमी झाले आहेत. परिणामी एनएमएमटीच्या तिकीट महसुलात घट होत आहे. विशेषतः एनएमएमटीच्या वाशी- कोपरखैरणे मार्गावर अधिक फटका बसत आहे. त्यामुळे एनएमएमटीने या मार्गावर उत्पन्न वाढीसाठी नियोजन करणे गरजेचे आहे, असे वृत्त मे महिन्यात लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची परिवहन उपक्रमाने दखल घेतली असून लवकरच वाशी- कोपरखैरणे मार्गावर वातानुकूलित बस मधून किमान ५रुपये तिकीट दर लागू करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>पनवेल: पॅनकार्ड बँकखात्यासोबत लींक करण्याच्या बहाण्याने २ लाख ७० हजार लुटले
एनएमएमटीच्या वाशी-कोपरखैरणे मार्गावर एकूण १३४बसच्या ५८६ बस फेऱ्या होतात. वाशी रेल्वे स्टेशन ते कोपरखैरणेअंतर्गत ५५ बस असून २४०फेऱ्या तर कोपरखैरणे ते पनवेल, नेरुळ, कळंबोली,तळोजा, खारघर या मार्गावर ७९बस असून ३४०बस फेऱ्या होतात. बेस्टच्या तुलनेत दुप्पट तिकीट दराने एनएमएमटीचा प्रवास होता,मात्र आता वाशी-कोपरखैरणे मार्गावर सरळ मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित बस मध्ये हे किमान ५ रु ते १५रुपये तिकीट दर लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता एनएमएमटी बसचा प्रवास देखील सोयीचा ठरेल, तसेच एनएमएमटीची प्रवासी संख्या ही वाढेल .
वाशी-कोपरखैरणे मार्गावर प्रवासी वाढविण्यासाठी नियोजन सुरू आहे. लवकरच सरळ मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित बसमध्ये किमान ५ रु ते १५रुपये तिकीट दर लागू करण्यात येणार आहे.-योगेश कडूसकर, व्यवस्थापक, नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम