निविदा स्वीकृतीसाठी आज महासभेत प्रस्ताव

नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात केंद्र शासनाच्या फेम- २ अंतर्गत आणखी १०० विद्युत बसगाडय़ा खरेदी करण्यात येणार आहेत. शुक्रवारी होणाऱ्या महासभेत बसगाडय़ांच्या स्वीकृतीबाबतचा प्रस्ताव येणार आहे.

याआधीच्या पूर्ण क्षमतेने चालविण्यात येणाऱ्या ३० बसगाडय़ांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इलेक्ट्रीक बससाठी प्रति किलोमीटर १६ रुपये खर्च, तर डिझेल बसगाडय़ांसाठी  ३० रुपये खर्च येत  आहे. त्यामुळे तोटय़ातील  परिवहन उपक्रमासाठी विद्युत बस  फायद्याच्या ठरत आहेत. नवी मुंबई शहरात विद्युत  वाहनांसाठी चार्जिंग उभारण्याच्या प्रशासकीय प्रस्तावानंतर निविदा स्वीकृतीचा प्रस्ताव येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  केंद्राने याआधी पालिकेला ३० विद्युत बसगाडय़ा दिल्या आहेत. त्या सध्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत.

आता फेम-२ अंतर्गत केंद्राच्या अनुदानातून १०० इलेक्ट्रीक बस खरेदीचा प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून निविदा स्वीकृतीला मंजुरी देण्यासाठी प्रस्ताव महासभेत येणार आहे. केंद्र शासनाच्या उद्योग  मंत्रालय यांनी फेम-२ अंतर्गत अनुदान योजना सुरू केली. त्यानुसार त्यांनी ४ जून २०१९ रोजी या योजनेच्या अटी आणि शर्ती प्रसिद्ध केल्या. १० लाख लोकसंख्या असलेल्या शहराकरीता १०० बसेसचा प्रस्ताव पाठवणे आवश्यक होते. त्यानुसार  नवी मुंबई महापालिकेने २०० विद्युत गाडय़ांचा प्रस्ताव शासनाला १ जुलै २०१९ ला सादर केला होता. त्यानुसार केंद्राने पालिकेला १०० विद्युत  बसगाडय़ांच्या  प्रस्तावाला २० ऑगस्ट  २०१९ रोजी मंजूरी दिली. त्यात  १० ते १२ मीटर लांबीच्या ७० गाडय़ा तर ८ ते १० मीटर लांबीच्या ३०  गाडय़ा घेण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे.

त्याप्रमाणे पालिकेने  चार्जिंग स्टेशन उभारणे आणि १०० गाडय़ा खरेदी करणे याबाबत प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता परिवहन उपक्रमासाठीच्या  १०० विद्युत  बसगाडय़ांसाठी निविदा स्वीकृतीसाठी  प्रस्ताव महासभेत येणार आहे. एका १२ मीटर लांबीच्या बसची अंदाजित किंमत १ कोटी ७५ लाख असून ९ मीटर लांबीच्या बसची किंमत १ कोटी २५ लाख रुपये आहे.  त्यामुळे १०० बसेससाठी एकूण १६० कोटी लागणार असून केंद्र शासन ५२ कोटी, तर कंत्राटदाराला  १०८ कोटी उभे करावे लागणार आहेत.

पालिकेचा परिवहन उपRमाला दरमहा जवळजवळ  ५.५० कोटीचा तोटा होत असून खर्चाच्या दृष्टीने परवडणाऱ्या या इलेक्ट्रीक बस असून त्यांचा फायदा परिवहन उपRमाला होत आहे. या बस घणसोली वाशी,घणसोली नेरुळ,सीबीडी वांद्रे मार्गावर चालवल्या जात आहेत. -शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई महा पालिका

Story img Loader