पनवेल शहरातील प्रवाशांना बससेवा अत्यंत महत्त्वाची आहे, याची जाणीव नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम सेवेला झाली आहे. एनएमएमटीच्या ७६ क्रमांकाच्या बसमधून पाच दिवसांत पाच हजार प्रवाशांनी ये-जा केली आहे.
काही रिक्षाचालकांचा या बससेवेला विरोध असला तरीही ही बस चालवणारच, असा खणखणीत इशारा एनएमएमटीचे सभापती साबू डॅनियल यांनी देऊन प्रवाशांना दिलासा दिला आहे. तरीही ही बससेवा १० मिनिटांच्या अंतरावर सुरू असावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे ७६ क्रमांकाच्या बससेवेतील तिकीट विक्रीतून ३३ हजार रुपये तिजोरीत जमा झाले आहेत.
पनवेल रेल्वेस्थानकातून शहरातील शिवाजी चौक आणि टपालनाक्याला वळसा मारून करंजाडे वसाहतीमधील प्रवाशांना नेणाऱ्या बससेवेला दिवसेंदिवस प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. या बसमुळे या परिसरातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
१५ तारखेला रामनवमीच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ झालेल्या ७६ क्रमांकाच्या बससेवेच्या पहिल्याच दिवसातील तिकीट विक्रीतून १७०० रुपये जमा झाले. दुसऱ्या दिवशी १६ तारखेला हाच आकडा तिप्पट वाढून पाच हजार ३२८ रुपयांचा झाला, तसेच तिसऱ्या दिवशी दोन हजार रुपयांची वाढ होऊन सात हजार १४९ रुपयांवर ही तिकीट विक्री केली. तिकीट विक्रीचे हे प्रमाण दोन हजारांनी वाढत आहे. त्यामुळे चौथ्या व पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवापर्यंत अनुक्रमे साडेआठ व साडेनऊ हजारांपर्यंत तिकीट विक्री झाली. पाच हजार प्रवाशांच्या सोयीची असलेली ही बससेवा दिवसाकाठी २० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न देईल, अशी अपेक्षा एनएमएमटीला आहे. १८ मिनिटांनी एक अशी बससेवा करंजाडे सेक्टर ६ येथून पनवेल रेल्वेस्थानकपर्यंत जाण्यासाठी सुटते. सर्व प्रवाशांच्या हिताची असणाऱ्या या बससेवेमुळे तीन आसनी रिक्षाचालकांच्या व्यवसायावर गदा येत असल्याची तक्रार काही रिक्षाचालकांनी लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांसमोर मांडली आहे.
सध्या कोणताही अनुचित प्रकार होऊ नये आणि बससेवा अखंडित सुरू राहावी यासाठी पोलिसांनी सावधगिरी म्हणून प्रत्येक बसमध्ये पोलीस तैनात आहेत. सध्या पनवेल परिसरात नवीन बससेवा सुरू करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
प्रवाशांची बाजू प्रशासनासमोर मांडण्यासाठी आणि ही बससेवा अविरत चालू राहावी या मागणीसाठी सिटीझन युनिटी फोरम या संघटनेचे (कफ) सर्व सदस्य लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस, एनएमएमटी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा