घणसोली आगारातील मार्ग क्रमांक १४४ या इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागली व काही वेळात बस जळून खाक झाली. ही घटना आज ( सोमवारी) रात्री पावणे नऊच्या सुमारास ऐरोली रबाळेच्या अंतर्गत रस्त्यावर घडली. यात जीवित हानी झाली नाही. आज संध्याकाळी आठच्या सुमारास घणसोली ते मुलुंड ही मार्ग क्रमांक १४४ ही बस निघाली. मात्र बस मध्ये बिघाड झाल्याने एन एम एम टी प्रशासनाने दुसऱ्या बसची सोय केली.
हेही वाचा >>> नवी मुंबई : हरवलेले आजोबा जेष्ठ नागरिक दिनी कुटुंबीयात परतले; स्वच्छता मोहिमेतील स्वयंसेवकांची मोलाची मदत
दुसऱ्या बस मधून प्रवासी मार्गस्थ झाल्यावर सदर बस मधील तांत्रिक बिघाड तात्पुरता दुरुस्त करण्यात आला. आणि बस पुन्हा घणसोली डेपो कडे मार्गक्रमण करत असताना ऐरोली रबाळे अंतर्गत रस्त्यावर सेंट झेव्हीयर्स शाळे नजीक बस मधून अचानक धूर येणे सुरू झाले. त्यावेळी बस रिकामी व केवळ वाहन चालक असल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला बस लावून स्वतःहा बाहेर उडी मारली. या नंतर काही क्षणात बस ने आग पकडली व पाहता पाहता भडका उडतपूर्ण बस जळून गेली. बस नवीन होती. याबाबत चौकशीचे आदेश दिले जातील अशी माहिती एन एम एम टी व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांनी दिली. तर एन एम एम टी समितीचे माजी सदस्य समीर बागवान यांनी अतिरिक्त माहिती देताना सांगितले की बस नवीन असताना असा प्रकार होणे धक्कादायक आहे. असा प्रकार यापूर्वीही झाला होता. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र यामुळे बस घेण्यापूर्वी नेमकी काय तपासणी करून बस ताफ्यात घेतात हे गौडबंगाल उकलणे गरजेचे आहे . अन्यथा कदाचित पुढील अपघातात मनुष्य हानिचा सामना करावा लागेल. असा काळजीयुक्त इशारा दिला.