नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करतांना प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी कॅशलेस व्यवहारासाठी फोन-पे, क्युआर कोड स्कॅनिंग तसेच एन.एम.एम.टी.बस ट्रॅकर ॲपद्वारे तिकीट बुकींग व ऑनलाईन बसपास यांच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे. यातून प्रवाशांना कॅशलेस प्रवासाची मुभा मिळेल त्याच बरोबर एनएमएमटीचे पेपरलेस तिकीटांचे उद्दिष्टे ही साध्य होत आहे. वर्षभरात २ लाख ८७ हजार प्रवाशांची ऑनलाइन बुकिंगला पसंती दिली जात असून कॅशलेस प्रवासाकडे वाटचाल सुरू झाली आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेच्या परिवहन सेवेने अनेक अत्याधुनिक व स्मार्ट सुविधा प्रवाशांकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत.
वातानुकूलित बस, प्रत्येक बस थांब्यावर बसेस व त्यांची वेळ, घरबसल्या तिकीट बुक करण्यासाठी ऍप अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच बरोबर बएनएमएमटीचे पेपरलेस तिकीट उद्दिष्ट ठेवून प्रवाशांना आता कॅशलेस प्रवास करता यावा यासाठी प्रवासी वर्गाला फायदेशीर ठरणारे फोन पे, क्युआर कोड स्कॅनिंग यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना कॅशलेस व्यवहार करून तिकीट उपलब्ध होत असून यामुळे कित्येकदा उद्भवणारी सुट्या पैशांची चणचण देखील सुटत आहे. ऑनलाइन तिकिट बुकिंग सुविधा करोना काळात २०२०मध्ये सुरू करण्यात आली. त्यावेळी करोना दरम्यानच्या काळात कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात आली. मागील वर्षी ऑगस्ट २०२१मध्ये ५५ हजार प्रवाशी ही ऑनलाइन सुविधा वापरत होते. मागील वर्षभरात यामध्ये वाढ होऊन आजमितीला २ लाख ८७ हजार प्रवाशी ऑनलाइन तिकीट बुकिंग करीत आहेत.
एनएमएमटीच्या ऑनलाइन तिकिट बुकिंगला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. मागील वर्षभरात २ लाखाहून अधिक प्रवासी ऑनलाइन सुविधेच्यामाध्यमातून तिकीट बुक करीत आहेत. – योगेश कडूस्कर, व्यवस्थापक , नवी मुंबई महानगरपालिका परिवहन