नियमात नसतानाही राबवलेली योजना अखेर रद्द
एनएमएमटी तोटयात असताना गेली काही वर्षे हद्दीबाहेरील ज्येष्ठ व अपंगांना प्रस्तावात नसतानाही तिकीट दरात सवलत दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खद्द पालिका आयुक्तांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आदेश काढत ही सवलत तात्काळ बंद केली. मात्र यामुळे एनएमएमटी प्रशासनाचा आंधळा कारभार समोर आला आहे. दररोज ५ लाख तर महिन्याला सुमारे दीड कोटी तोटा होत आहे.
सुरुवातीला पालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांना व अपंगांना तिकिटात ७५ टक्के सवलत होती. परंतु सप्टेंबर २०१७ मध्ये ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव आणला. त्यामध्येही पालिका क्षेत्रातीलच अपंगांना मोफत व ज्येष्ठांना ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी फेब्रुवारी २०१८ पासून करण्यात आली. परंतु यातही पालिका क्षेत्राबाहेरील ज्येष्ठ व अपंगांना सवलत देण्याचा नियम नसताना ती दिली जात होती. पालिका आयुक्तांनी याबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. एनएमएमटी प्रशासनाने केलेल्या या चुकीमुळे कोटय़वधींचा तोटा परिवहन उपक्रमाला बसला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात एकूण ४८५ बसगाडय़ा असून त्यातील ४५० बसगाडय़ा मुंबई, कल्याण, डोंबिवली, उरण, पनवेल, भिवंडी, बदलापूर अशा पालिका क्षेत्राबाहेरील भागात धावतात. त्यामुळे या ७० मार्गावर पालिकेच्या क्षेत्राबाहेरील ज्येष्ठ नागरिकांना व अपंगांना प्रस्तावात नसताना एनएमएमटीच्या दुर्लक्षामुळे व आंधळ्या कारभारामुळे सवलत दिली गेली आहे.
आता अचानक पालिका क्षेत्राबाहेरील अपंगांना व ज्येष्ठांना ही सवलत बंद केल्यामुळे या प्रवाशांची नाराजी वाढत आहे. कार्डवरील पत्ता पाहून ते ज्येष्ठ व अपंग पालिका क्षेत्रातील असतील तरच तिकिटात सवलत दिली जाणार आहे. फक्त पालिका क्षेत्रातीलच अपंगांना व ज्येष्ठांना तिकिटात ५० टक्के सवलत व अपंगांना मोफत प्रवास दिला जाणे गरजेचे होते. परंतु तसे न करता परिवहन दुर्लक्षामुळे पालिका क्षेत्राबाहेरील ज्येष्ठांना व अपंगांनाही सवलत दिली गेली आहे. त्याचे प्रमाण ४० ते ५० टक्के आढळून आले आहे. त्यामुळे सवलत बंद केली आहे.
– डॉ.रामास्वामी एन. आयुक्त, नवी मुंबई महापालिका
पालिका परिवहन उपक्रमात आतापर्यंत सरसकट सर्व ज्येष्ठांना व अपंगांना तिकिटात सवलत दिली जात होती. आता इंधन दरवाढीचे कारण पुढे करून ही सवलत रद्द करण्यात आली आहे. त्याच वेळी एसटी महामंडळाने मात्र, इंधनदरवाढीनंतरही ज्येष्ठ व अपंगांसाठीच्या सवलती रद्द केलेल्या नाहीत. याचा परिवहन प्रशासनाने विचार करायला हवा.
– समीर बागवान, परिवहन सदस्य