‘एनएमएमटी’च्या ‘रिंग रूट’ सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन परिवहन प्रशासनाने तीन नव्या मार्गावर बस सुरू केल्या आहेत. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता कोपरखरणे, नेरूळ आणि वाशी विभागांत ही सेवा सुरू राहील.
पालिका हद्दीत रेल्वे स्थानक ते रहिवाशी वसाहतीअंतर्गत बससेवा कमी ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना ‘नकारदार’ रिक्षाचालक आणि त्यातील काही मुजोर चालक जेरीस आणतात. याबाबत वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक ते रहिवासी वसाहती या मार्गावर बस सुरू व्हावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करीत आहेत. त्यामुळे आता एनआरआय ते एलपी नेरुळ या मार्गावर ३७ क्रमांकाची बस सुरू करण्यात आली आहे, तर सेक्टर ६ वाशी ते बामन डोंगरी ही पाम बीचमार्गे नेरुळ सेक्टर १५ वरून पुढे पालिका मुख्यालयावरून बामन डोंगरीकडे १७ क्रमांकाची बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच कोपरखरणे रेल्वे स्थानक ते सेक्टर २२ माताबाल रुग्णालय ते पुन्हा कोपरखरणे रेल्वे स्थानक अशी आहे, तर घणसोली आणि ऐरोलीमध्येही रिंग रूट सेवा सुरू करणार असल्याचे प्रस्तावित आहे.