नवी मुंबई महानगरपालिका एकीकडे वातानुकूलित बससेवाचे स्वप्न रंगवत असली तरी तिकीट तपासनीसांच्या कामचुकारपणामुळे ‘एनएमएमटी’ला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली या मार्गावर हे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिकीट तपासणीस केवळ हजेरी लावण्यासाठी येत असल्याने हा तोटा सहन करावा लागत असल्याचे ‘एनएमएमटी’च्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
एनएमएमटीच्या बसमधून फुकटात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एनएमएमटी तिकीट तपासनीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे फुकटय़ा प्रवाशांचे फावले आहे. याचा परिणाम म्हणून महसुलात घट होत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत ६१५४ फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.
त्याच्याकडून ६ लाख ७४ हजार ३६७ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तर जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ४८१० फुकटय़ा प्रवाशांकडून पाच लाख ३६ हजार ४५९ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.
२०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये फुकटया प्रवांशावर होणारी कारवाई वाढण्याऐवजी ही घटत चालली आहे. वाहतूक तपासणीस कर्मचांऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे फुकटे प्रवासी बसमधून सटकतात. यातील काहीजण वर्षभरासाठीचे लक्ष्यही पूर्ण करीत नाहीत.
तिकीट तपासनीस कर्मचांऱ्याना दिवसाला किमान २ तरी फुकटय़ा प्रवाशांना पकडावे असे अपेक्षित आहे. परिवहन सेवेतील निम्म्याहून अधिक तिकीट तपासनीस दांडय़ा मारण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे हा तोटा सहन करावा लागत आहे. त्यांच्यावर राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे ते अधिकाऱ्यांशीही अरेरावीची भाषा करतात.
यांसदर्भात परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर सहाय्यक वाहतूक अधीक्षक उमेश पाटील यांनी सांगितले की, निवडणुकीच्या कामामुळे तिकीट तपासनीस यांना बाहेर जावे लागते. त्यामुळे तिकीट तपासणीस कमी असल्याने २०१४ च्या तुलनेते २०१५ फुकटे प्रवाशांवर कमी कारवाई करण्यात आली असून कमी दंड वसूल झाला आहे.

Story img Loader