ताफ्यातील सर्वच बसगाडय़ा रस्त्यावर उतरवल्या तर अधिकाधिक प्रवाशांची वाहतूक करून रिती झालेली तिजोरी थोडीफार भरता येईल, या उद्देशाने एनएमएमटीने मंगळवारी बस दिन साजरा केला. परंतु उरण मार्गावर नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या दोन बसगाडय़ांचे ब्रेक डाऊन झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. उरणसाठी महत्त्वाची वाहतूक सेवा असतानाही या मार्गावर नादुरुस्त बसगाडय़ा चालविण्यात येत असल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उरण परिसर व द्रोणागिरी नोड हा नवी मुंबईचा एक भाग आहे. या परिसरातही सिडकोची विकासाची कामे जोमाने सुरू आहेत. त्यामुळे भविष्यातील नवी मुंबईतील द्रोणागिरी नोड हा सर्वात मोठा नागरी वस्ती असलेला विभाग म्हणून गणला जाणार आहे. या विभागाला जोडण्यासाठी कोपरखैरणे, वाशी, तुर्भे तसेच कळंबोली येथून नियमित एनएमएमटीच्या बस सोडल्या जात आहेत. याचा फायदा येथील नोकरदार, विद्यार्थी तसेच मुंबई व नवी मुंबईत ये-जा करणाऱ्यांना जलद प्रवासासाठी होत आहे. बंदरातील जड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सध्या येथील प्रवासी त्रस्त आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटी बस सेवेच्या नादुरुस्तीमुळेही त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात एनएमएमटीचे वाहतूक व्यवस्थापक अनिल शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. तर एनएमएमटी बस डे साजरा करीत असता व हात दाखवा बस थांबवा ही योजना राबविण्याचा पालिकेचा विचार आहे.

Story img Loader