नवी मुंबई : शहर अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या नवी मुंबई पालिकेने विद्युत इंधनावर चालणारी वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून प्रशासनासाठी चार वाहनांचा प्रस्ताव यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. या शिवाय पालिकेच्या परिवहन सेवेत ८० विद्युत बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालिकेने डिझेलवर चालणाऱ्या १८० बस गाडय़ांचे सीएनजी बसमध्ये परिवर्तने केले आहे. ‘एनएमएमटी’च्या ताफ्यात सध्या ६०० बस आहेत.
नवी मुंबई पालिकेने पहिले शासकीय विद्युत वाहन चार्जिग स्टेशन पामबीच मार्गावर उभारले आहे. त्यामुळे नवी मुंंबईची वाटचाल विद्युत वाहनांच्या दिशेने सुरू असून पालिका अधिकऱ्यांसाठी विद्युत वाहने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. चार्जिग स्टेशन उपलब्ध करून दिल्यास नवी मुंबईकर जास्तीत जास्त विद्युत वाहने खरेदी करतील असा अंदाज आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेनेही या वाहनांच्या चार्जिगसाठी २० ठिकाणी चार्जिग केंद्रे उभारण्याचे ठरविले आहे.
‘एनएमएमटी’ने यापूर्वी १८० विद्युत बस खरेदी केल्या आहेत. आता आणखी ८० विद्युत बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. पालिकेने यापूर्वीच १८० डिझेल बसेस सीएनजीमध्ये परावर्तीत केल्या आहेत. टप्प्याटप्प्याने पालिका सर्व ४२० बसेस सीएनजी करणार आहे.