शेखर हंप्रस
देशात पहिलाच प्रयोगाचा दावा; व्यवहार्य चाचणी सुरू
कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने बेस्ट व एसटीने स्मार्टकार्ड आणल्यानंतर नवी मुंबई एनएमएमटीने ‘ओपन लूप’ कार्ड आणले आहे. याची चाचणी सुरू असून प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासात सुटय़ा पैशांवरून कंडक्टरशी होणारे वाद टळतील. या योजनेत विशिष्ट रक्कम भरून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याच दावा एनएमएमटी प्रशासनाने केला आहे.
देशात किंवा राज्यात सर्वप्रथम अनेक उपक्रम नवी मुंबई पालिकेने राबवले आहेत. त्यात आता या कार्डची भर पडणार आहे. हे कार्ड डेबिट कार्डप्रमाणे वापरता येणार असून सध्या तरी ‘एनएमएमटी’मध्येच चालणार आहे. भविष्यात याच वापर हा बेस्ट, रेल्वेतही होऊ शकेल, असे ‘एनएमएमटी’ प्रशासनाने म्हटले आहे.
प्रवास करत असताना तिकीट काढताना सुटय़ा पैशांवरून अनेकदा वाद होतात. त्यामुळे बेस्टने स्मार्टकार्ड योजना अमलात आणली. मात्र ती बेस्टपर्यंतच मर्यादित राहिली. वास्तविक आजचा प्रवासी हा मिळेल त्या सेवेने पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे सर्व मिळून एकच उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे ‘एनएमएमटी’ने या कार्डचा वापर करण्याचे ठरविले आहे.
प्रीपेड कार्डप्रमाणे ‘ओपन लूप’ कार्डमध्ये किमान ५०० रुपयांची सुविधा मिळणार असून यंत्रात कार्ड वापरल्यावर मिळणाऱ्या तिकिटमध्ये रेल्वे आणि अन्य सर्व परिवहन सेवेच्या बसचा प्रवास करता येणार आहे. या कार्डसाठी रिझव्र्ह बँक आणि नॅशनल पेमेंट कंपनी ऑफ इंडिया यांची मंजुरी मिळाली असून सुरुवातीला हे कार्ड प्रायोगिक तत्त्वावर एनएमएमटीत सुरू करण्यात येणार आहे. या कार्डची सुरुवातीची किंमत ५० रुपये राहणार असून त्यात कमी-जास्त किमत होऊ शकते. यामध्ये तांत्रिक यंत्रणा वापरण्यासाठी बायोतंत्र वापरण्यात आले आहे.
नोकरदार वर्गाला फायदा
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पनवेल, उरणमधील चाकरमान्यांना हे कार्ड फायदेशीर ठरणार आहे. या कार्डसाठी एचडीएफसी बँकेचे सहकार्य घेण्यात आले असून महापालिका मुख्यालय छायाचित्र असलेले हे कार्ड ‘नवी मुंबई परिवहन ओपन लूप कार्ड’ म्हणून ओळखले जाणार आहे.
अशा प्रकारचे कार्ड यापूर्वी फक्त कोचीमध्ये वापरण्यात आले. मात्र ते फक्त ठरावीक ठिकाणी वापरण्यात आले. मात्र ‘ओपन लूप’ नावाचे हे कार्ड सर्वत्र चालणार असून देशात पहिलाच प्रयोग असणार आहे. भविष्यात हीच प्रणाली प्रत्येक ठिकाणी लागू होणार असून त्यातही हे कार्ड चालणार आहे.
– शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी