नवी मुंबई : सिडको मंडळाच्या ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेतील घरांचे दर कमी करण्याबाबत कार्यवाहीचे कोणतेही आदेश राज्य सरकारकडून मिळाले नसल्याचे स्पष्टीकरण सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांनी दिले. शुक्रवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, या घरांच्या किमती कमी करण्यासाठी सिडकोच्या संचालक मंडळात सूचना देऊ तसेच मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांची लवकरच भेटून चर्चा करु, असे आश्वासन सिडकोचे माजी अध्यक्ष आणि विद्यामान मंत्री संजय शिरसाट यांनी तीन दिवसांपूर्वी दिले होते.

सोडती मधील सर्वच घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असल्याची माहिती सह व्यवस्थापकीय संचालक गोयल यांनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत दिली. खासगी विकसकांपेक्षा परवडणाऱ्या दरात सिडकोने ही घरे उपलब्ध करुन दिली आहेत. तळोजा आणि खारघर या दोन उपनगरांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काही बांधकाम सुरू आहे. पुढील वर्षी या मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत खारघरमधून तळोजा गाठता येईल. त्यामुळे यापुढे तळोजा परिसराला खारघर पूर्व असेच बोलता येईल असेही गोयल म्हणाले.

हेही वाचा >>>शिरसाट यांच्या फक्त घोषणाच! सिडको अध्यक्षपदावरील निर्णयांबाबत उलटसुलट चर्चा

सिडकोच्याघरांसोबत महागृहनिर्माण परिसरात व्यायामशाळा, वाहनतळ, बगीचा अशा विविध सुविधाही सामान्यांना मिळणार आहे. पहिल्या दोन वर्षांचे मासिक मेंटनेंस सिडको आकारणार नसल्याकडेही गोयल यांनी लक्ष वेधले.

सिडकोच्या घरांच्या बांधकामाची उत्तम गुणवत्ता, परिपूर्ण दळणवळण आणि कोणत्याही छुप्या शुल्काशिवाय पारदर्शक यंत्रणेद्वारे ही घरे सामान्यांना सोडत प्रक्रियेतून दिले जात आहेत. नागरिकांनी देशाच्या सर्वात मोठ्या आर्थिक उलाढाल होणाऱ्या नवी मुंबईसारख्या शहरात आपल्या स्वप्नातले घर घेऊन कुटूंबासोबत रहावे असे आवाहन करतो.- शान्तनू गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ

Story img Loader