नवी मुंबई : वनमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी वाशी येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेला ‘खासदार आपल्या भेटी’ला उपक्रमाचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असतानाच ‘नाईकांच्या जनता दरबाराशी ही स्पर्धा नाही’, अशी स्पष्टोक्ती त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली. मी या शहराचा खासदार आहे आणि महिन्यातून किमान एकदा तरी येथील लोकांशी संवाद साधण्यासाठी मी येणार आहे, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या जनता दरबाराचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढण्यात आले. भाजपच्या आक्रमक राजकारणाचा हा भाग असल्याचे निरीक्षणही राजकीय वर्तुळात नोंदविण्यात आले. नाईक यांच्या जनता दरबाराला आठवडा उलटत नाही तोच ठाण्याचे शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी वाशी येत ‘खासदार आपल्या भेटीला’ या उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी महापालिकेसह वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांशी देखील संवाद साधला. नवी मुंबईतील गावठाणांमधील गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न तसेच सिडको वसाहतींमधील घरांना पाठविण्यात आलेल्या नोटीसा प्रकरणी नागरिकांचे गाऱ्हाणे खासदारांनी यावेळी ऐकून घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा उपक्रम म्हणजे कोणाशीही स्पर्धा नाही, असे सांगितले.

मतदारांना प्रत्यक्ष जाऊन भेटण्याचा प्रयत्न

नवी मुंबईचा जो मतदार आहे, त्याला त्याला प्रत्यक्ष भेटणे, नागरिकांचे प्रश्न सोडवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ही कुठलीही स्पर्धा नाही. जनता दरबार वगैरेला हे उत्तर तर अजिबात नाही, असे खासदार म्हस्के यांनी यावेळी स्पष्ट केले. या ठिकाणचा मी खासदार आहे आणि पंधरवड्यात एकदा येथील रहिवाशांना भेटावे, त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत ही माझी सुद्धा इच्छा होती. लोक त्यांच्या समस्या घेऊन ठाण्यात येत असतात. त्या तिथेही सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. परंतु मतदारसंघातील वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हस्के यांनी यावेळी सांगितले.

गणेश नाईक महायुतीचे नेते

गणेश नाईक हे आमच्या महायुतीचे नेते आहेत. ठाण्यात येऊन जर ते लोकांचे प्रश्न सोडवत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. लोकांना सरकार दरबारी, सरकारी कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागतात ते मारावे लागणार नाहीत. प्रत्येक मंत्र्यांचा असा दरबार झाला तर त्याचा लोकांना फायदाच आहे, असे म्हस्के यावेळी म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा युती मिळून लढावं अशी कार्यकर्त्यांची आणि मतदारांची अपेक्षा असते. आमची युती म्हणून पण लढण्याची तयारी आणि वेगळं लढायला सांगितले तर तेही करु, असे म्हस्के म्हणाले.