उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या उरण-नेरुळ रेल्वे मार्गावरील उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चार महिने उलटल्यानंतर अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेली नाही. यामुळे ऐन उन्हाळ्यात घामाघूम झालेल्या हजारो प्रवाशांवर पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहण्याची वेळ आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
जानेवारी २०२४ पासून उरण-नेरुळ मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मागील चार महिन्यांपासून प्रवासी संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढच होत चालली आहे. उरण-नेरुळ रेल्वे मार्गावरील उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी टाक्या, मोठमोठे कूलर, नळ जोडण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अद्यापही चारही स्थानकांवर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. आधीच उरणला उष्म्याचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत चढल्याने प्रवासी पुरते घामाघूम होऊ लागले आहेत. मात्र उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने प्रवाशांवर पाण्यावाचून घसा कोरडा पडू लागला आहे.
हेही वाचा : वर्षभर लसणाचे दर चढेच
तसेच या चारही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अद्यापही शौचालयाची सोयही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या प्रवाशांची पाणी आणि शौचालयाच्या अभावामुळे मोठी गैरसोय होऊ लागली आहे. चारही स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची सोय उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने सध्या फक्त कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर करण्याची मुभा कर्मचारी काही वेळा प्रवाशांना आणीबाणीच्या परिस्थितीत करण्यासाठी देतात, अशा प्रतिक्रिया रेल्वे कामगारांकडूनच व्यक्त करण्यात येत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधून माहिती घेऊ, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी एस. के. जैन यांनी सांगितले.