स्वस्त कर्जामुळे वाहन, घर खरेदीसाठी मुहूर्ताची घाई
गुढीपाडव्याला अर्थात साडेतीन मुर्हूतापैकी एका मुहूर्तावर गुंजभर तरी सोनं खरेदी करण्याची परंपरा; परंतु त्यावर यंदा बंदचा ‘झाकोळ’ पसरला आहे. या दिवशी सोनेखरेदीची मोठी उलाढाल होते; मात्र यंदा सराफांनी करवाढीविरोधात काही दिवसांपासून बंदचे हत्यार उपसल्याने सोनेखरेदीचे काय, असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. काहींनी याविषयी नाराजीही व्यक्त केली.
नवी मुंबईतील अनेक ठिकाणी सोनेखरेदीचा उत्साह दिसून येत आहे. या खरेदीसाठी अनेकांनी आर्थिक तजवीजही केली आहे; परंतु ‘बंद’ने अनेकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. सोनेखरेदीचा महत्त्वाचा मुहूर्त निसटून जाणार असल्याने अनेकांनी किमान ऑनलाइन सोनेखरेदीचा पर्याय निवडता येईल का, याची चाचपणी करून पाहिल्याचे ‘महामुंबई वृत्तांत’ला सांगितले.
याच वेळी वाहन कर्जे स्वस्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वाहनखरेदीसाठी अनेकांनी प्राधान्य दिले आहे. मंदीच्या वातावरणात बांधकाम व्यवसायात घरांच्या किमती स्थिर आहेत, तसेच गृहखरेदीतील व्याजदरात कपात झाल्याने ग्राहकांनी पाडव्याच्या मुहूर्तावर घर खरेदीस प्राधान्य दिले आहे. बांधकाम व्यावसायिकांनी काही गृहप्रकल्पांमध्ये सवलती देऊ केल्या आहेत. त्यामुळे यंदा उलाढाल वाढण्याची शक्यता असल्याचे बांधकाम व्यावसायिकाने स्पष्ट केले.
सराफा व्यावसायिकांनाही हा बंद मनापासून करायचा नव्हता; परंतु केंद्र सरकारने केलेल्या करवाढीविरोधात चर्चेचे सर्व दरवाजे बंद झाल्यानंतर बंदचे हत्यार उपसावे लागले. बंदमुळे सराफांनाही नुकसान सोसावे लागणार आहे, असे एका व्यावसायिकाने सांगितले.
वाहन खेरदी मध्ये यंदा नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आठवडयभरापासून दिवसाला २०० दुचाकी वाहनांची नोंद होत आहे. तर इतर वेळेला ही संख्या सुमारे १०० असते. तर चारचाकी वाहनांची संख्या सरासरी ३० असते. पण पाडव्याच्या मुहुर्तावर यामध्ये वाढ होत आठवडयाभरापासून ७० वाहनांची नोंद झाली आहे असे उपप्रादेशिक परिवहन आधिकारी संजय धायगुडे यांनी स्पष्ट केले.