शहर पोलिसांना मशीद विश्वस्तांचे आश्वासन
सार्वजनिक गणेशोत्सव रस्त्यावर साजरे करण्यास न्यायालयाने बंदी आणल्यानंतर पोलिसांनी आपले लक्ष मशिदींवरील भोंगे आणि रस्त्यांवरील होणाऱ्या नमाजाकडे वळविले आहे. पोलिसांच्या या सादेला पनवेल शहरातील ११० वर्षांची परंपरा असलेल्या मोमीनपाडा येथील याकूब बेग मशिदीच्या विश्वस्तांनी प्रतिसाद देऊन, यापुढे रस्त्यावर नमाज अदा करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये यापुढे नमाज अदा करण्यासाठी रस्ता वगळून इतर खुल्या मैदानाचा आधार घेण्याचे आश्वासन याकूब बेग मशिदीचे विश्वस्त मुन्ना बेग यांनी दिले.
बेग यांनी पोलिसांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची दखल सर्व मुस्लीम समाजाने घ्यावी, यासाठी मोमीनपाडा येथील मशिदीच्या बाहेर फलक लावला जाणार आहे. तसेच मशिदीच्या अपुऱ्या जागेवर तोडगा म्हणून मशिदीच्या मागील मोकळी जागा स्वच्छ करून तिथे यापुढे नमाज अदा केला जाणार असल्याची माहिती बेग यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
सर्व धर्माच्या प्रमुखांनी असा पुढाकार घेऊन कायद्याची अंमलबजावणी केल्यास समाजात तेढ निर्माण होणार नाही. बेग यांच्या निर्णयामुळे पनवेलमधील धर्म एकोप्याची परंपरा जपली जाईल.
-बाजीराव भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर