नवी मुंबई नगरपालिका क्षेत्रात मोरबे धरण प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात असून काही भागांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी घेऊन पुरवले जाते. मात्र यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पालिका क्षेत्रातील नवीन नळजोडणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन जोडणीसाठी अर्ज करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना विभाग कार्यालयातून हात हलवत परत जावे लागत आहे. कमी पावसामुळे मोरबे धरणात जलसाठा कमी असून पावसाळ्यापर्यंत पाणी पुरणे गरजेचे असल्याने पालिकेने पाणीकपात सुरू केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण क्षेत्रामधील पाणीसाठाही आटला आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेने नवीन नळजोडणीला मंजुरी देणे बंद केले आहे. २००० पर्यंतच्या झोपडय़ांना नळजोडणी देण्याचा निर्णय महासभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे. परंतु यंदा पाणीसाठा कमी असल्यामुळे सध्या नवीन नळजोडणी बंद करण्यात आली आहे, असे पाणीपुरवठा उपअभियंता अजय पाटील यांनी सांगितले.

Story img Loader